समीर देशपांडेकोल्हापूर : नेहमीच्या वर्गातील शिक्षणाबरोबरच परिसर ज्ञान मिळावे म्हणून आयोजित करण्यात येत असलेल्या शैक्षणिक सहलींसाठी एक, दोन नव्हे तर तब्बल २२ प्रकारची कागदपत्रे गोळा करावी लागत असल्याने सहल नेणारे शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. त्यात भरीस भर म्हणून यंदापासून मुख्याध्यापकांचा १00 रुपयांच्या स्टॅम्पवरील हमीपत्र सक्तीचे केल्याने सहल नेण्याची भानगडच नको, असा सूर शिक्षकांमधून उमटत आहे.
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती मिळावी, त्यांनी प्रत्यक्ष गडकिल्ले पाहावेत, इतिहास आणि भूगोल समजून घ्यावा आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे; यासाठी गेली अनेक वर्षे शालेय सहलींचे आयोजन केले जाते; परंतु मध्यंतरीच्या काळात काही घडलेल्या प्रकारांमुळे या सहली नेण्यावर शासनाच्या शिक्षण विभागाने निर्बंध आणले होते; मात्र २0 मे २0१७ च्या निर्णयानुसार पालकांच्या संमतीने अशी वर्षातून एकदाच सहल नेता येईल, असा आदेश काढण्यात आला; परंतु हे करत असताना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शिक्षक हवालदिल होताना दिसत आहेत.
शाळा समितीचा ठराव, सहल जी. आर., गटशिक्षण अधिकारी पत्र, आगारप्रमुख एस. टी. अर्ज, केंद्रप्रमुख पत्र, शिक्षक विस्तार अधिकारी पत्र, पालक संमती पत्र, विद्यार्थी संमती पत्र, सहभागी विद्यार्थी यादी, शिक्षक यादी, सहभागी विद्यार्थी व शिक्षक हजेरी पत्रक, नियमावली, नियोजन व ठिकाणे दर्शक नकाशा, सहल खर्च अंदाजपत्रक, प्रथमोपचार पेटीसोबत असलेल्याचे पत्र, विद्यार्थी, शिक्षक ओळखपत्र, विद्यार्थी साहित्य यादी, शिक्षण अधिकारी मान्यता पत्र, सहलीसाठी सक्ती न केलेले विद्यार्थी संमती पत्र, सहल महाराष्ट्र राज्याबाहेर जात नसल्याबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र ही कागदपत्रे सादर केल्यानंतर मगच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाते. याही पुढे जाऊन काही शाळा विद्यार्थ्यांच्या एक दिवसाचा विमाही उतरत आहेत.१00 रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्रएवढ्यावरच न थांबता शासनाने १00 रुपयांच्या स्टॅम्पवर मुख्याध्यापकांचे हमीपत्र सक्तीचे केले आहे. एस. टी. महामंडळाच्याच गाड्या सहलीसाठी घेण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांवर सक्ती केली नसल्याचे यामध्ये नमूद करावे लागत आहे. एवढे करण्यापेक्षा सहल न नेलेली बरी, अशा प्रतिक्रिया शैक्षणिक वर्तुळातून उमटत आहेत.