कोल्हापूर : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५०० महिला पोलीस दिवस-रात्र ड्युटी करीत आहेत. घर सांभाळून जनसेवा करण्यासाठी त्या बाहेर पडत आहेत. देशावर आलेल्या महासंकटामुळे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
‘कोरोना’च्या संकटकाळात लोकांनी घरी थांबणे यासाठी शासनाकडून सर्वस्तरावर प्रबोधन केले जात आहे. तरीही काही लोक रस्त्यावर येऊन शासनाचे आदेश धाब्यावर बसवित आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलीस हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्हा पोलीस दलातील ५०० महिला कर्मचारी कोरोनाच्या लढ्यात उतरल्या आहेत. घरी मुलाबाळांचे आवरून, जेवण करून त्या ड्यूटीवर येत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून महिला पोलीस रात्रंदिवस ड्यूटी करीत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तीन सीफ्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावल्या आहेत. सात तास ड्यूटी करून कर्मचाºयाने घरी जाण्याचे नियोजन केले आहे. पोलिसांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातही सॅनिटायझरसह मास्क कमी पडू नयेत, याची खबरदारी घेतली आहे. ‘कोरोना’च्या लढाईत महिला पोलिसांचे योगदानही महत्त्वाचे ठरत आहे.