कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने (केएमटी) जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांकरिता पन्हाळा येथे एकदिवसीय मोफत सहल काढण्यात आली. तीन बसेसमधून १२८ महिलांना मोफत पन्हाळादर्शन घडवून आणण्यात आले.शाहू मैदान बस नियंत्रण केंद्र येथून रविवारी सकाळी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या हस्ते बसपूजन करण्यात आले. सर्व महिलांना कोल्हापुरी फेटा बांधून परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी स्वागत करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त कोल्हापूर शहर ठेवण्यासाठी शपथ दिली. त्याचप्रमाणे सर्व महिलांनी प्लास्टिक मुक्ती अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी के. एम. टी.च्या सिव्हिल विभागाकडील महिला कर्मचारी आणि महिला वाहक कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला आणि बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, परिवहन समिती सदस्य अशोक जाधव, शेखर कुसाळे, शैलजा शेखर कुसाळे, सदस्य महेश वासुदेव, चंद्रकांत सूर्यवंशी, यशवंत शिंदे, प्रसाद उगवे, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, महेश उत्तुरे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष देसाई, वाहतूक निरीक्षक रवी धूपकर, प्रकल्प अधिकारी पूर्णेंदू गुरव, मेंटेनन्स इंजिनिअर अमरसिंह माने, कामगार अधिकारी संजय इनामदार, स्थानक प्रमुख बी. बी. चंदन उपस्थित होते.खर्डा-भाकरीवर तावसहलीतील सर्व महिलांना जेवणाची सोयही ‘केएमटी’कडून करण्यात आली होती. फुग्यांनी सजविलेल्या बसमधून नेऊन त्यांना पन्हाळा येथील सर्व प्रसिद्ध ठिकाणे दाखविण्यात आली. यानंतर पिठले, भाकरी, ठेचा, दही असा अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद त्यांना देण्यात आला.