कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील ३० हेक्टर जागा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 12:28 PM2023-10-06T12:28:50+5:302023-10-06T12:29:31+5:30
मुंबई- कोल्हापूर : कोल्हापुरात आयटी पार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या पार्कची उभारणी ...
मुंबई-कोल्हापूर : कोल्हापुरात आयटी पार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या पार्कची उभारणी तातडीने करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
कोल्हापूर आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, वित्तचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महसूलचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तेथे आयटी पार्क आवश्यक आहे. तेथील तरुणांना यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. त्यामुळे कृषी विद्यापीठाची जागा घेताना त्यांना पर्यायी जागा द्यावी. विशिष्ट कालमर्यादेत पार्क उभे न राहिल्यास जमीन कृषी विद्यापीठाला परत द्यावी. विद्यापीठाच्या या जागेपासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुणे नंतर कोल्हापूर शहर हे एक चांगला पर्याय आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीही जागा द्या
कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किंवा शहरात मध्यवर्ती ठिकाणची अन्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही पवार यांनी याबाबतच्या बैठकीत दिले. या उपकेंद्रामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कामासाठी वारंवार नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही. यातून वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होणार आहे.