मिरज : मिरजेत बुधवारी दुपारी भरदिवसा चोरट्यांनी शिवाजी रोडवर रिक्षा अडवून पोस्टाची ३० लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. पोस्ट कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्याने रोकड लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.मिरजेत शिवाजी रोडवरील स्टेट बँकेच्या शाखेतून मुख्य पोस्ट कार्यालयात दररोज लाखो रुपये रोकड नेण्यात येते. पोस्ट कर्मचारी दररोज रिक्षातूनच रोकडची ने-आण करतात. बुधवारी दुपारी मुख्य पोस्टमन हनुमंत कंक, पोस्ट खजिनदार अल्ताफ पठाण स्टेट बँकेच्या शाखेतून ३० लाखांची रक्कम घेऊन नेहमीच्या रिक्षातून पोस्टाकडे जात होते. लोखंडी पेटीत व कातडी बॅगेत २० लाखांची रोकड रिक्षात ठेवली होती. रिक्षा प्रियदर्शिनी हॉटेलजवळ आल्यानंतर रस्त्यावर वाहतूक जास्त असल्याने रिक्षाचा वेग कमी झाला. याचवेळी रिक्षाच्या दोन्ही बाजूने दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी रिक्षाचालक अशोक गोरे यांना दत्तनगर कोठे आहे, अशी विचारणा करीत रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालक गोरे यांनी रिक्षा न थांबवता त्यांना पत्ता सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिक्षाच्या दुसऱ्या बाजूने एका तरुणाने रिक्षातील लोखंडी (पेटी व बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्टमन कंक व पठाण यांनी चोरट्याला प्रतिकार करीत लोखंडी पेटी व बॅग घट्ट धरून ठेवली. चोर-चोर असा आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पलायन केले. या घटनेमुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. पोस्ट कार्यालयातून दररोज पोलिस बंदोबस्ताशिवाय लाखो रुपये रकमेची रिक्षातून ने-आण करण्यात येते. चोरट्यांनी पाळत ठेवून पोस्टाची रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या घटनेबाबत पोस्ट अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिलेली नाही. मात्र बँकेतून रोकड आणण्यासाठी यापुढे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. (वार्ताहर)
पोस्टाची ३० लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न
By admin | Published: May 04, 2017 12:17 AM