कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीचेप्रदूषण रोखण्याच्या आणाभाका प्रशासन गेली अनेक वर्षे घेत आहे. परंतु प्रदूषणापासून मुक्ती देण्यात त्यांना आजही यश आलेले नाही. या प्रश्नांवर दबाव निर्माण करण्यात आपण सारेच कोल्हापूरकर कमी पडत आहोत. वानराच्या घराप्रमाणे प्रश्न तयार झाल्यावरच आपल्याला त्याची जाग येते. या प्रदूषणाची तीव्रता मांडणारी वृत्तमालिका आजपासून..भारत चव्हाणकोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिका प्रशासनाने बऱ्याच उपाययोजना केल्या असल्या तरी त्यास शंभर टक्के यश आलेले नाही. आजही शहरातील ३० एमएलडी सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. शंभर टक्के सांडपाणी रोखणे आणि त्यावर योग्य प्रक्रिया करण्यास आणखी किमान दीड वर्ष लागणार आहे. हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याची २८० कोटींची कामे लवकरच सुरू होणार आहेत. नदीच्या प्रदूषणात सर्वांत मोठा वाटा कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेचा आहे; परंतु या दोन्ही महापालिकांना या प्रदूषणाबद्दल फारसे देणेघेणे नाही, असाच अनुभव गेल्या दशकातील आहे.दुधाळीतील जादा सांडपाणी प्रक्रिया केंद्रसर्वाधिक सांडपाणी वाहून नेणारा दुधाळी हा दुसऱ्या क्रमांकाचा नाला आहे. या नाल्यावर १७ ‘एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित आहे. आता आणखी सहा एमएलडी क्षमतेचे जादा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असून, त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे.चार खेडेगावांचे सांडपाणी नदीतशहराच्या हद्दवाढीस विरोध करणाऱ्या शहरालागतच्या कळंबा, पाचगाव, आर. के. नगर, मोरेवाडी या गावांतील सुमारे १५ एमएलडी सांडपाणी रोज जयंती व गोमती नाल्यातून येत असून, या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा भार महापालिका यंत्रणेवर पडला आहे.पाच नाल्यांतून सांडपाणी नदीतशहरातील लक्षतीर्थ वसाहत, सीपीआर, राजहंस, लाइन बाजार, बापट कॅम्प येथून येणाऱ्या नाल्यातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. या नाल्यावर फायटो ट्रीटमेंट, तसेच ब्लिचिंग पावडरचा तात्पुरता डोस दिला जात आहे.
सध्या कार्यरत सांडपाणी प्रक्रिया केंद्र
- कसबा बावडा - ७६ एमएलडी
- दुधाळी - १७ एमएलडी
- कसबा बावडा - ६ एमएलडी
प्रस्तावित कामे अशी -
- दुधाळी ड्रेनेज लाइन, एसटीपी - ५७ कोटी
- जयंती नाला उपसा केंद्र व एसटीपी - ५२ कोटी
- लाइन बाजार ड्रेनेज, उपसा केंद्र - ३२ कोटी
- बापट कॅम्प झोन ड्रेनेज लाइन, एसटीपी - १३९ कोटी
- तीन कामांच्या निविदा प्रसिद्ध, एकाची प्रक्रिया सुरू
रोजच्या सांडपाण्याचा हिशोब
- रोज निर्माण होणारे सांडपाणी - १३५ एमएलडी
- रोज प्रक्रिया होणारे सांडपाणी - १०५ एमएलडी
- थेट नदीत मिसळणारे सांडपाणी - ३० एमएलडी
रखडलेले भूसंपादनलाइन बाजार येथे नाला अडविण्याकरिता बंधारा घालावा लागणार आहे. त्या ठिकाणी सहा एमएलडी उपसा केंद्र उभारण्याकरिता लागणारी जागा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनात अडचणी आल्या आहेत. मूळ मालकांनी विरोध केल्याने भूसंपादनाचे काम रखडले आहे.