कोल्हापूर : कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले असून रविवारी यात आणखी ३० रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३६१ वर पोहोचली. कोल्हापूर शहरातील वाढीचा वेग रविवारीही कायम राहिला, तर आतापर्यंत चार हात लांब असलेल्या ग्रामीण भागातही कोरोनाने पुन्हा हात पसरण्यास सुरुवात केल्याचे रुग्णांच्या संख्येवरून दिसत आहे. ३० पैकी १७ कोल्हापूर शहरातील, तर १३ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.
रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीच्या ७९९ प्राप्त अहवालापैकी ७७३ निगेटिव्ह, तर ५ अहवाल पॉझिटिव्ह, ॲन्टिजेन टेस्टिंग चाचणीच्या १०५ प्राप्त अहवालांपैकी १०० अहवाल निगेटिव्ह, तर ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी रुग्णालये, लॅब मध्ये २२४ प्राप्त अहवालांपैकी २०४ निगेटिव्ह, तर २० असे एकूण ३० अहवाल पॉझिटिव्ह आले.
या पॉझिटिव्ह अहवालापैकी भुदरगड, हातकणंगले, कागल या तालुक्यात प्रत्येकी एक, करवीर तीन, नगरपरिषद क्षेत्रातील सहा, कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील १७ व इतर जिल्हा व राज्यातील एक असे रुग्ण आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ५० हजार ६६४ पॉझिटिव्हपैकी ४८ हजार ५५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.