इचलकरंजी : यंत्रमाग क्षेत्रामध्ये आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होण्यासाठी ‘टफ’ योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी ३० टक्के निधी मिळावा, छोट्या यंत्रमाग कारखान्यांना भविष्य निर्वाह निधी कायदा लागू करू नये, अशा आशयाच्या मागण्या करणारे निवेदन इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्यावतीने केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टमटा यांना दिले.
नवी दिल्ली येथील उद्योग भवनात देशातील यंत्रमाग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संघटनांची एक बैठक केंद्र सरकारने आयोजित केली होती. यंत्रमाग उद्योगामध्ये आधुनिकीकरण व ऊर्जा बचत या विषयासाठी ही बैठक आयोजित केली होती. बैठकीवेळी घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विजेच्या बचतीसाठी साथी योजनेची माहिती देण्यात आली.
बैठक झाल्यानंतर इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, पॉवरलूम डेव्हलपमेंट अॅण्ड एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष पुरुषोत्तम गोयंका यांनी यंत्रमाग क्षेत्राच्या ऊर्जितावस्थेसाठी आवश्यक असलेल्या सवलतींच्या मागणीचे एक निवेदन राज्यमंत्री टमटा यांना दिले. निवेदनामध्ये, मुद्रा योजनेमध्ये यंत्रमाग उद्योगाचा समावेश करावा. सवलतीच्या दराने वीजपुरवठा करावा. आयात होणाºया कापडावर अॅँटी डंपिंग ड्युटी वाढवावी. ईपीसीजी योजनेअंतर्गत डिम्ड एक्स्पोर्ट युनिटना योजनेचा लाभ द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनातील मागण्यांचा विचार वस्त्रोद्योग मंत्रालय सहानुभूतीने करेल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले.‘साथी’ योजनेत इचलकरंजीचा समावेशनवी दिल्ली येथील उद्योग भवनात यंत्रमाग संघटनांच्या प्रतिनिधींसमोर, यंत्रमागासाठी वापरण्यात येणाºया इलेक्ट्रिक मोटारीची कार्यक्षमता वाढवून विजेची बचत करणारी नवतंत्रज्ञानाची मोटार तयार केली आहे, त्याबाबतची माहिती सांगितली.
त्याचबरोबर यंत्रमाग उद्योगामध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी ‘साथी’ योजनेमार्फत या मोटारी सवलतीच्या दरात पुरविण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी ‘साथी’ योजनेसाठी देशातील इचलकरंजी, भिवंडी, सुरत व इरोड या यंत्रमाग केंद्रांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासंदर्भात लवकरच या केंद्रांमध्ये यंत्रमागधारकांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री टमटा यांनी दिली.