लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॉकडाऊन, भाजीपाला विक्रीसाठी दिलेले वेळेचे बंधन यामुळे काेल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा उठाव कमी झाला आहे. तब्बल ३० टक्के भाजीपाला समितीतच राहू लागल्याने शेतकरी व अडते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
कोल्हापूर बाजार समितीमधून रोज गोवा, कोकणासह स्थानिक व्यापाऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला जातो. मध्यंतरी आठ दिवस कडक लॉकडाऊन होते. त्या कालावधीत समितीमधील सौदे पूर्णपणे बंद राहिल्याने शेतकऱ्यांचा माल शेतातच राहिला. आता सौदे सुरू झाले खरे मात्र मालाचा उठाव होत नाही. त्यात भाजीपाला विक्रीसाठी सकाळी सात ते अकरा ही वेळ दिल्याने भाजी खरेदी करून विक्री कधी करायची, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे या कालावधीत जेवढा शेतीमाल विक्री होईल, तेवढाच खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल आहे.
बाजार समितीत रोज साधारणत: २५०० क्विंटल भाजीपाल्याची आवक होते. शनिवारी मात्र त्यात मोठी वाढ होऊन तब्बल ३७७० क्विंटल आवक झाली. त्यात उठाव नसल्याने ३० टक्के भाजीपाला बाजार समितीतच राहिला.
भाजीपाल्याचा उठाव न होण्याची कारणे
आठवडी बाजार बंद
खाणावळी, हॉटेल बंदमुळे मागणी घटली
लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांचा परिणाम
विक्रीसाठी दिलेली चार तासांची वेळ
विक्रीची वेळ ७ ते दुपारी १ करा
बाजार समितीतून भाजीपाला घेऊन जाऊन विक्री करण्यास सुरुवात सकाळी नऊ वाजता हाेते. दोन तासांत विक्री होत नाही. त्यामुळे विक्रीची वेळ सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.
शिल्लक भाजीपाल्याचा अडत्यांना फटका
शेतकऱ्यांनी माल लावल्यानंतर सौद्यातील दरानुसार त्याची पट्टी केली जाते. त्या मालाचा उठाव झाला नाहीतर दुसऱ्या दिवशी तो विकावा लागतो. भाजीपाला नाशवंत असल्याने दुसऱ्या दिवसापर्यंत त्यातील २० टक्के माल खराब होतो. त्याचा फटका अडत्यांना बसत आहे.
कोट-
भाजीपाल्याची वाढलेली आवक, त्यात विक्रीसाठी वेळेचे बंधन या कारणांमुळे माल शिल्लक राहत आहे.
- जमीर बागवान (अध्यक्ष, महालक्ष्मी भाजी मार्केट असोसिएशन)
बाजार समितीतील शनिवारी शेतीमालाची आवक क्विंटलमध्ये
शेतीमाल आवक
कांदा ६०११
बटाटा १९००
लसूण २८०
भाजीपाला ३७०७
फळे ९३०
फोटो ओळी : काेल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची आवक वाढल्याने उठाव न झाल्याने भाजीपाला शिल्लक राहिला. (फोटो-२९०५२०२१-कोल-बाजार समिती)