पांडुरंग फिरंगे -- कोतोली -कणेरी (ता. पन्हाळा) येथील ग्रामस्थांना एक महिन्यापासून पाण्याच्या एका बॅरेलला ३०० रुपये मोजावे लागत आहेत. जनावरांचा पाणीप्रश्नही गंभीर बनला असून, कामधंदा सोडून पाणी मिळविण्यासाठी दिवस-रात्र भटकावे लागत आहे. गटातटाच्या श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल होत आहेत.गावची तीन हजारांची लोकवस्ती असून, गावापासून नदी लांब असल्याने तेथून पाणी आणण्याचा खर्च ग्रामपंचायतीला झेपणारा नाही. म्हणून गावाला पिण्याच्या पाण्यासाठी गावाजवळच बोअर मारण्यात आले होते. त्या बोअरचे पाणी टाकीत साठवून गावाला सोडले जात होते. अनेक वर्ष पाणी सुरळीत येत होते. पण गतसालच्या दुष्काळामुळे बोअरचे पाणी कमी झाले. सध्या तर एक महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत असून, पिण्याचे पाणी कोतोलीतून विकत घ्यावे लागत आहे. एक बॅरेल पाण्यासाठी ३०० रुपये मोजावे लागत असून, यामुळे सर्वसामान्य जनतेच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.ग्रामपंचायतीला बोअरचे लाईट बिल परवडत नसल्यामुळे मोटार बंद होती. ती सध्या चालू केली असून, या बोअरवर प्रत्येकी दोनच घागरी पाणी मिळत आहेत. येथे पाणी मिळवण्यासाठी महिलांची कमालीची गर्दी पहावयास मिळत आहे.ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पन्हाळा पंचायत समिती, जिल्हाधिकारी, आदींना याबाबत निवेदने दिली आहेत. पाणी टंचाईकडे कोणी लक्ष देणार का, अशीच समस्या कायम राहणार, असा जनतेतून प्रश्न केला जात आहे. तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने कणेरी व गावाला लागून असलेल्या दोन वाड्यांच्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करून जनतेची समस्या मिटवावी, अशी मागणी होत आहे.कणेरीपैकी भोसलेवाडी, गवळेवाडी ग्रामस्थांना पंधरा दिवसांतून सध्या पाणी मिळत आहे. दिवस-रात्री पाणी मिळविण्यासाठी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या सण, समारंभ, लगीनघाई असताना पाणीटंचाई होत आहे. यामुळे काम करायचे की पाणी मिळवायचे? जनावरांना पिण्याचे पाणी मिळविण्यास अडचणी आहेत. याचा दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. येथील जनतेचा लोकप्रतिनिधींनी केवळ मतदानापुरताच वापर करुन घेतला आहे. बाकी इतर समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. - अर्जुन गवळी, ग्रामस्थ..ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने विविध प्रयत्न चालू केले आहेत. लवकरच यावर कायमचा मार्ग काढू. - तानाजी लगारे, उपसरपंच कणेरी गावात असलेल्या दोन्ही गटांनी मीपणा सोडल्याशिवाय गावच्या समस्या सुटणार नाहीत. नेतेमंडळींनी यातून मार्ग काढावा. - विश्वास गायकवाड, ग्रामस्थगावची पाणीटंचाई सोडविण्यासाठी नेत्यांनी मार्ग यातून काढावा व पाण्यासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवावा. - वैशाली पाटील, महिला.
कणेरीत ३00 रूपयाला पाण्याचे बॅरेल
By admin | Published: March 20, 2017 11:37 PM