कोल्हापूर : कस्टमर केअरमधून बोलतोय, असे भासवून अज्ञाताने बँक खात्यावरील ४४ हजार २०० रुपये परस्पर वर्ग करुन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी धीरेंद्र रमेशराव घारुड (वय ४२ रा. पिनाक व्यंकटेश अपार्टमेंट, मंगळवार पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल दिली. ३० जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी सांगितले की, फियार्दी घारुड ३० जुलै रोजी भीम अॅपमधून एलआयसीचे रक्कम पाठवित होते. ही रक्कम वर्ग झाली नसल्याने त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्या वेळी चार ते पाच मोबाइल क्रमांकावरुन अज्ञाताने घारुड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बँकेचे खाते क्रमाकांसह आॅनलाइन प्रक्रियेची सर्व माहिती घेतली.
ही प्रक्रिया सुरु असताना अज्ञाताने त्यांच्या खात्यावरील ४४ हजार २०० रुपयांची रक्कम काढून घेतली. दरम्यान खात्यावरुन रक्कम कपात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. सायबर विभागाच्या तज्ज्ञांच्या मदतीने संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.