कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरात सुरू असलेल्या संजीवनी अभियानाअंतर्गत मंगळवारी झालेल्या सर्वेक्षणात ३१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. कोरोनाची बाधा झाल्यानंतरही या व्यक्ती घरात, समाजात वावरत होत्या. त्यांचे निदान झाल्यामुळे त्यांच्यापासून होणारा संसर्ग रोखण्यात यश आले.
शहरातील अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ५१४० नागरिकांची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात व्याधीग्रस्त ८४० नागरिकांपैकी ३१ पॉझिटिव्ह व ८०९ निगेटिव्ह आढळून आलेत. यावेळी ५००५ व्याधीग्रस्त नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोविडसदृश लक्षणे असणारे ८६ नागरिक आढळून आले. तर १०८३ व्याधीग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
मंगळवारी १५२ वैद्यकीय पथकाद्वारे यामध्ये संभाजीनगर, राजाराम चौक, देशपांडे गल्ली, शाहूनगर, शाहूपुरी, दौलतनगर, जोशी गल्ली, गवत मंडई, दुधाळी, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, साईस एक्स्टेंशन, टाकाळा, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, महाडीक माळ, नंदनवन कॉलनी, फुलेवाडी, गंधर्वनगरी, राजोपाध्येनगर, सर्वेश पार्क, लक्षतीर्थ वसाहत, कदमवाडी, जाधववाडी, रमनमळा, बिंदू चौक, आपटेनगर, देवकरपाणंद येथे सर्वेक्षण करण्यात आले.