कोल्हापूर : वीज बिल थकबाकीमुळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या महावितरणाला तारण्याच्या आवाहनात कोल्हापूर व सांगलीतील शेतकरी महिला ग्राहकांनीही तब्बल ३१ काेटींची बिले भरुन खारीचा वाटा उचलला आहे. या महिलांचा आज, सोमवारी महिला दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधीक स्वरूपात कौतुक सोहळा महावितरणच्या कार्यालयात होणार आहे.
कृषी वीज ग्राहकांनी थकबाकीमुक्त व्हावे म्हणून महावितरणकडून १ मार्च ते १४ एप्रिल हे कृषी ऊर्जा पर्व अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत चालू व थकीत बिलांचा भरणा करण्यासाठी विशेष सवलतही लागू केली आहे. याचा लाभ घेणाऱ्यांमध्ये महिला शेतकरीही आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. अभियान सुरू झाल्याच्या आठवडाभरातच कोल्हापूर परिमंडळात येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील २८५ शेतकरी महिलांनी २६ कोटी ८० लाखांची थकबाकी, तर ४ कोटी ७५ लाखांची चालू बिले भरली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २२७ महिला आहेत. त्यांनी २० कोटी ११ लाखांची थकबाकी, तर ३ कोटी ५३ लाखांची चालू वीज बिले भरली आहेत. सांगली जिल्ह्यातील ५८ महिला ग्राहकांनी ६ कोटी ६९ लाखांच्या थकबाकीसह १ कोटी २२ लाखांची चालू बिले भरली आहेत.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेती समृद्ध करण्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. भले सातबारा नावावर नसेल, पण शेतीची बहुतांश कामामध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो. घरातील कर्त्या पुरुषाच्या पश्चात हिंमतीने शेती सांभाळणाऱ्या महिलांची संख्याही कमी नाही. ज्या प्रामाणिकपणे त्या शेतात राबतात त्याच प्रामाणिकपणे त्या आपण वापरत असलेल्या पाण्यासाठीचे वीज बिलही भरतात हे महिलांनी बिले प्रामाणिकपणे भरून दाखवून दिले आहे.