इचलकरंजी : शहरात उद्भवणाऱ्या कोरोना संसर्ग व गृहविलगीकरण बंद करण्याचे शासनाचे आदेश तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने संस्थात्मक विलगीकरण केंद्रासाठी शहरातील ३२ शाळा आणि मंगल कार्यालये त्याचबरोबर विलगीकरणासाठी ५ मोठी कार्यालये निश्चित केली असून, लहान मुलांच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बालरोगतज्ज्ञांशी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.
शहर परिसरात विविध उपाययोजना करूनही कोरोनाचा संसर्ग फैलावत चालला आहे. सध्या १२० जणांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू असून, असे उपचार घेणाऱ्यांच्या संपर्कातील नागरिकांनाही संसर्ग होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता शासन आदेशानुसार २३ मेपासून नगरपरिषदेने गृहविलगीकरण बंद केले आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अलगीकरण केंद्रासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील ३२ शाळा आणि मंगल कार्यालये निश्चित केली आहेत, तर सर्व सुविधा असलेल्या पंचरत्न, रघुजानकी, यशोलक्ष्मी, महेश सेवा समिती आणि त्यागी भवन अशी ५ मोठी कार्यालये विलगीकरणासाठी निश्चित करण्यात आली आहेत. याठिकाणी सुमारे २२ हजार नागरिकांची सोय होऊ शकते. लहान मुलांच्या संसर्गाचाही धोका व्यक्त होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर बालरोगतज्ञ्जांची लवकरच बैठक घेणार असल्याचे डॉ. संगेवार यांनी सांगितले.