समीर देशपांडेकोल्हापूर : जागतिक बॅंकेने दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील महापुरावर उपाययोजनेसाठी ३,२०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे आम्ही कृष्णा खोऱ्यातील महापुरावर दिलेल्या अहवालाचे यश आहे, परंतु यातून संपूर्ण महापूर नियंत्रण अशक्य आहे. तर, यातील काही अतिरिक्त पाणी दुसरीकडे वळवून उपयोगात आणता येईल एवढेच हाेईल, असे स्पष्ट मत वडनेरे समितीचे प्रमुख आणि जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे यांनी रविवारी व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांची खास मुलाखत घेतली. हैदराबाद येथे चालू असलेल्या जलसिंचन विषयावरील परिसंवाद नंदकुमार वडनेरे हे सहभागी होण्यासाठी गेले आहेत. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे
प्रश्न : आपण जो अहवाल दिलात, त्यानंतर शासनाने काही कारवाई केली का ?उत्तर : हो हो... आपण अहवाल दिल्यानंतर अजित पवार, जयंत पाटील आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घातले. आम्हीही सातत्याने याचा पाठपुरावा करत होतो. यातूनच मग याबाबतचा प्रकल्प प्रस्ताव जागतिक बॅंकेकडे गेला आणि ३,२०० कोटी रुपयांचा हा महापूर नियंत्रणासाठीचा निधी मंजूर झाला आहे. आम्ही दिलेल्या अहवालाचे हे मोठे यश आहे.
प्रश्न : या अहवालामध्ये आपण नेमकी काय मांडणी केली होती ?उत्तर : या अहवालामध्ये या दोन्ही जिल्ह्यांत सर्व बाजूंनी येणारे पाणी, धरणे, विसर्ग, या दोन जिल्ह्यांतून पाणी सुलभतेने निघून जाण्यासाठीचे उपाय, कर्नाटकातील विविध धरणे आणि त्यातील पाणी विसर्ग याबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर काय उपाय केले पाहिजेत, यांची मांडणी केली होती. कर्नाटक आणि महाराष्ट्रात मंत्री, सचिव आणि अधिकारी पातळीवर सुसंवादातून पाणी विसर्गाचे सध्याचे काम चांगल्या पद्धतीने चालले आहे.
प्रश्न :कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठी काय करता येईल?उत्तर : एक वास्तव लक्षात घेतले पाहिजे की, कोल्हापूरला यापुढच्या काळात पूर टाळता येणार नाही, कारण कोल्हापूरच्या वरच्या भागातील ८५ टक्के क्षेत्रावर जो पाऊस पडतो, तो अडवण्यासाठी तितकी धरणे नाहीत. त्यामुळे बहुतांशी पडलेला पाऊस थेट कोल्हापूरकडेच येतो. सांगलीकडे किमान वारणा, कोयना या धरणाच्या दरवाजांचे योग्य नियोजन करून शक्य झाल्यास नियंत्रण करता येईल, परंतु तसे कोल्हापूरला होणार नाही. त्यामुळे पूर येणार ही मानसिकता आपण केली पाहिजे.
प्रश्न : पुरासाठी आणखी काेणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ?उत्तर : कोणत्याही पूल बांधकामासाठी नदीत टाकलेला भराव हा पुरासाठीचे एक मोठे कारण आहे. वास्तविक पाहता नदीपात्रात बाहेरील किंचितही माती येता कामा नये, पण अनेक पुलांचे बांधकाम करताना भराव टाकून काम केले जाते. इथपासून ते निळ्या रेषेच्या आत मोठ्या प्रमाणावर झालेली बांधकामे, अतिक्रमणे या गोष्टीही कारणीभूत आहेत.
प्रश्न : यावर उपाय काय ?उत्तर : लवकरात लवकर पुराची पूर्वसूचना मिळणे, सर्व प्रकारचे नुकसान कमी होण्यासाठी हवामानाचा अचूक अंदाज लवकर समजणे यांसह अनेक उपाय सुचवलेले आहेत. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजेही बदलून नवे दरवाजे बसवण्याचीही शिफारस आहे. ज्यामुळे पाणी नियंत्रित करता येईल.
प्रश्न : या पुराशी अलमट्टीचा संबंध आहे की नाही ?उत्तर : संपूर्ण संबंध नाही, असे म्हणता येणार नाही, परंतु जर वरून आलेले पाणी त्यांनी तितक्याच प्रमाणात सोडले, तरी अलमट्टीचा कोल्हापूर, सांगलीला धोका होण्याचा प्रश्नच येत नाही. याच्याआधी त्यांच्याकडेही खाली पूर आल्यामुळे पाणी सोडताना मागे पुढे झाले, परंतु आता वरून जेवढे पाणी येते, तेवढेच खाली सोडले जात असल्याने अडचण येणार नाही, असे दिसते. त्यामुळे अलमट्टीमुळेच पूर येतो, असे म्हणता येणार नाही.
प्रश्न : महापूर नियंत्रणात येईल असे वाटते का ?उत्तर : हे म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखे आहे. दोन, अडीच लाख क्यूसेक महापुराचे पाणी खाली जाते. त्यातील ८ ते १० हजार क्यूसेक पाणी तुम्ही वळवून जिकडे पाणी नाही तिकडे देऊ शकाल, परंतु त्यामुळे महापुराचे नियंत्रण होईल, असे वाटत नाही. वाया जाणाऱ्या पाण्याचा चांगला उपयोग होईल इतकेच यातून होईल, परंतु केवळ कोल्हापूर, सांगलीच्या महापूर नियंत्रणासाठी १,६८० कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. त्याचा काही ना काही फायदा होईल. पूर आला तरी नुकसान टाळण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.
प्रश्न : हे काम कधी सुरू होईल ?उत्तर : हे काही एक बंधारा बांधण्याचे काम नाही. वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे काम होणार आहे. त्यामुळे या सगळ्याचा अंतिम आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी आम्हीही लक्ष ठेवून आहोत.