कोल्हापूर: पुरेशी लस उपलब्ध झाल्याने बुधवारी जिल्ह्यातील २५० केंद्रावर ३२ हजार ४०० जणांनी रांगा लावून कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. ३४ हजार लसींचे डोस मंगळवारीच उपलब्ध झाले होते. त्यातील ७० टक्के लस ही दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्याने देण्यात आली. लस मिळत असल्याने सीपीआरमध्ये तर दिवसभर रांगा होत्या.
कोल्हापुरातही लसींच्या टंचाईमुळे गेले आठवडाभर प्रचंड विस्कळीतपणा आला आहे, त्यातच १८ ते ४४ वयोगटातही प्रायोगिक तत्त्वावर लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिकच ताण आला आहे. पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांचा आग्रह वाढत असताना लसच शिल्लक नसल्याने केंद्रावर लसीकरण बंद असल्याचे बोर्ड झळकवण्याची वेळ आली होती. पहिल्या डोससाठी नोंदणी वाढत असताना दुसरा डोस घेण्यासाठीचीही यादी लांबत होती. त्यामुळे मंगळवारी मागणी केलेल्यांपैकी केवळ ३४ हजार लसींचे डोस आरोग्य विभागाकडे उपलब्ध होताच दुसरा डोस असणाऱ्यानाच ती देण्यास सुरुवात झाली.
फोटो: ०५०५२०२१-कोल-लसीकरण
फोटो ओळ: कोल्हापुरात बुधवारी लस उपलब्ध झाल्यानंतर सीपीआरमध्ये लसीकरणासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र होते.
(छाया: आदित्य वेल्हाळ)