मुरगूड : मुरगूड शहर व परिसरामध्ये औद्योगिक, घरगुती,कृषी व व्यापारी कारणासाठी मोठ्या प्रमाणात विजेची मागणी होती. मुदाळ तिठ्ठा येथे असणाऱ्या उपकेंद्रामधून वीज घेताना अनेक अडचणी येत होत्या. या सर्वामुळे मुरगूड शहर आणि परिसरातील सुमारे ५४ गावांतील मागणी विचारात घेऊन मुरगूड मध्ये ३३ केव्ही क्षमतेचे नवीन वीज केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. चे केंद्र मंजूर करण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केल्याचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले.
रगूडला स्वतंत्र वीज केंद्र होण्याची गरज होती. ३३ केव्हीचे वीज केंद्र स्थापण्याचा वीज महावितरण कंपनी व ऊर्जा खात्याकडे प्रस्ताव प्रलंबित होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी उपकेंद्र सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. पण प्रस्ताव देऊनही कागल तालुक्यातील मुरगूड हे नाव प्रस्तावित यादीत दिसत नव्हते. खासदार संजय मंडलिक यांनी याचा पाठपुरावा केल्याने या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली. या वीज केंद्रासाठी मुरगूड शहरात जांभुळखोरा व चिमगाव रस्ता या ठिकाणी जागा आरक्षित केली असून या जागेचा व अन्य दोन ठिकाणच्या जागांचा सव्हें करण्यात आला आहे. जागा निश्चित झाल्यानंतर अंदाजे चार कोटी ७९ लाख रुपयांच्या या प्रकल्पास सुरुवात होईल आणि साधारणतः एक वर्षांमध्ये हे काम पूर्णत्वास जाईल, असे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले. दरम्यान मुरगूडला वीज केंद्राला तांत्रिक मंजुरीचे पत्र आजच मिळाले.