गडहिंग्लज : येथील हलकर्णीनजीक चारचाकीतून १००० व ५०० च्या ३३ लाख ५० हजार रूपयांच्या चलनातून रद्द करण्यात आलेल्या जुन्या नोटा गडहिंग्लज पोलिसांनी हस्तगत केल्या. इंडिगो कारसह पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून आनंदा काडाप्पा पाटील व आडव्याप्पा करबसाप्पा मठपती (दोघे रा. आक्कन गिरेहाळ, ता. गोकाक, जि. बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.अधिक माहितीनुसार, हलकर्णी ते बसर्गे दरम्यान पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दुपारी दोनच्या सुमारास पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो कार (क्रमांक केए २२ एन ७२६३) बसर्गेच्या दिशेने येत होती. सदर कारच्या झडतीत मागील सीटवर रेगझीनच्या बॅगमध्ये १००० आणि ५०० रूपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. त्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता चालक पाटील तसेच शेजारी बसलेल्या मठपती यांना समाधानकारक माहिती देता आली नाही. पोलिसांनी दोघांना कारसह अटक करून निवडणूक निर्णय अधिकारी संगीता चौगुले यांना याबाबत माहिती दिल्याचे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. हसबनीस, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. ए. नागरगोजे, सहाय्यक फौजदार सर्जेराव झुरळे, मनोहर पवार, हवालदार संभाजी कोगेकर, संतोष घस्ती, विनायक सुतार आदींनी ही कारवाई केली. (वार्ताहर)हलकर्णी (ता. गडहिंग्लज)नजीक इंडिगो कारमध्ये आढळून आलेल्या जुन्या नोटा. दुसऱ्या छायाचित्रात खाली बसलेले आरोपींसमवेत पोलिस कर्मचारी.
गडहिंग्लजमध्ये आढळल्या ३३ लाखांच्या जुन्या नोटा
By admin | Published: February 17, 2017 11:27 PM