कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ शाखेत व्यवस्थापक अमर गुरव यांनी तब्बल ३३ लाखांचा अपहार केला आहे. कर्नाटकात खतविक्री करून तिचे पैसे परस्पर हडप करण्याचा उद्योग केल्याचे उघडकीस आल्याने संघात एकच खळबळ उडाली आहे.
संघाची तपासणी यंत्रणा आठवड्याला आढावा घेत असताना एवढा मोठा अपहार होतोच कसा? असा सवाल केला जात असून, यामध्ये केवळ व्यवस्थापकच गुंतला आहे की आणखी कोण, हे शोधण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनासमोर आहे.संपूर्ण आशिया खंडात नावाजलेल्या शेतकरी संघाची वाटचाल गेल्या दहा-पंधरा वर्षांत बिकट आहे. संघाचा बैल काहीसा उठून कामाला लागला; पण संघातील अपहाराने त्याच्या पायांतील बळ गेले आहे. शिरोळ शाखेत आतापर्यंतचा सर्वांत मोठा अपहार झाला आहे.
शाखा व्यवस्थापक अमर गुरव यांनी खताची विक्री कर्नाटकात केली, स्टॉक बुकला माल शिल्लक दाखवत त्याचे पैसे संघाकडे न भरता स्वत: वापरले. गेले अनेक वर्षे शाखेत हा प्रकार सुरू असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. गुरव यांनी संघाचे वरिष्ठ अधिकारी व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा अपहार केल्याची चर्चा सुरू आहे.
सोमवार (दि. १४) पासून संघात दबक्या आवाजात अपहाराची चर्चा सुरू होती. मंगळवारी सकाळी संघ व्यवस्थापनाने पाचजणांचे पथक पाठविले. त्यानंतर संघात एकच खळबळ उडाली. पथकाने दिवसभर कशा पद्धतीने व किती वर्षांपासून अपहार सुरू झाला, याची कसून चौकशी सुरू आहे. दोन दिवसांत पथक अहवाल सादर करणार आहे.
सक्षम तपास यंत्रणा; मग अपहार कसा?संघाचे निरीक्षक महिन्याला शाखांचा ताळेबंद तपासतात. महिन्याच्या सहा तारखेला व्यवस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, भाग निरीक्षक, तपासणी प्रमुखांसमोर ताळेबंद वाचून दाखविला जातो. मग हा अपहार नजरेस कसा पडला नाही? शिरोळपेक्षा मोठ्या शाखा खतांची मागणी करीत असताना याच शाखेला जादा खतपुरवठा करण्यामागे नेमके गौडबंगाल काय? हे खरे प्रश्न आहेत.
अपहाराचा सिलसिला कायमगेल्या चार-पाच वर्षांत अनेक शाखांतील छोटे-मोठे अपहार लेखापरीक्षणाद्वारे उघड झाले आहेत. त्यांच्यावर आरोप सिद्ध होऊन वसुलीची प्रक्रिया सुरू असताना शिरोळ शाखेत मोठा अपहार झाला आहे.
गुरव १५ वर्षे एकाच जागेवरशाखा व्यवस्थापक अमर गुरव हे गेले १५ वर्षे एकाच शाखेत काम करत आहेत. त्यांनी संपूर्ण यंत्रणेचा अंदाज घेऊन हा ढपला पाडल्याची चर्चा सुरू आहे. प्रथमदर्शनी ३३ लाखांचा अपहार दिसत असला तरी गुरव यांच्या मागील सर्व कामकाजाची चौकशी केल्यानंतर आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिरोळ शाखेतील अपहार निदर्शनास आला असून, त्याच्या चौकशीसाठी पथक नेमले आहे. अहवाल येताच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडणार नाही.- अमरसिंह माने,अध्यक्ष, शेतकरी संघ