गडहिंग्लज : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील नळपाणी पुरवठा योजनेची निविदा किंमत ३० लाख असताना त्यात ३३ लाखांचा भ्रष्टाचार कसा झाला? असा सवाल उपस्थित करतानाच तक्रारदार मिसाळ यांनी राजकीय द्वेषापोटीच ही तक्रार केली असल्याचा आरोप लिंगनूरच्या पदाधिकाऱ्यांनी खुलाशाच्या पत्रकातून केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते युवराज मिसाळ यांनी लिंगनूर येथील नळयोजनेत ३३ लाखांचा भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्या संदर्भात हा खुलासा करण्यात आला आहे.पत्रकात म्हटले आहे, नळयोजनेची ढोबळ किंमत ३३ लाख व निविदा किंमत ३० लाख इतकी आहे. योजनेचे ८० ते ८५ टक्के काम झालेले आहे. दरम्यान, मिसाळ यांनी तक्रार करून काम बंद पाडले आहे. योजनेच्या कामातील पंप व पाईप साहित्य ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. कामात कोणताही अपहार झालेला नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्यामुळे हेतूपुरस्सर तक्रारी केल्या आहेत. कामाच्या बिलापैकी ठेकेदारास केवळ ११ लाख रुपये देण्यात आले आहेत, तर ३३ लाखांचा भ्रष्टाचार कसा? काही माहिती नसताना लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामाचा दर्जा संंबंधित कार्यालयामार्फत ठरविण्यात येईल; मात्र विकृत राजकारणातून गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचा निषेध करीत आहोत, असेही पत्रकात म्हटले आहे.पत्रकावर ग्राम पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सरपंच काशिनाथ कांबळे, सचिव शशिकांत खांडेकर, उपसरपंच शामराव कोरे, ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक कुरळे व संदीप कुरळे, प्रवीण जाधव व सहदेव खांडेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
तीस लाखांच्या योजनेत ३३ लाखांचा भ्रष्टाचार कसा?
By admin | Published: June 18, 2015 9:49 PM