कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील ३३ जणांचा समावेश आहे. नव्या रुग्णवाढीच्या संख्येवरून शहरात प्रादुर्भावाची तीव्रता मोठी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक बनले आहे. दिवसभरात राजारामपुरी सातव्या गल्लीतील एका ८६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसभरात करवीर तालुक्यात ४, तर आजरा, गडहिंग्लज, पन्हाळा, हातकणंगले या तालुक्यांत प्रत्येकी एका नव्या रुग्णाची भर पडली. कोल्हापूर शहरात तब्बल ३३ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोल्हापूर शहरातील रुग्णसंख्या ही १५६४७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही ५०,४३७ पर्यंत पोहोचली आहे. सध्या कोरोना बळींचीही संख्या १७४४ वर गेली आहे. दिवसभरात पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सध्या २९३ कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत.