निपाणी : राज्य निवडणूक आयोगाने कर्नाटक राज्यातील तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर केले आहे. निपाणी तालुक्यातील सहा जिल्हा पंचायत मतदार संघांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे, पण या सहा मतदार संघांपैकी केवळ बेनाडी हा एकच मतदारसंघ सामान्य प्रवर्गासाठी ठेवण्यात आला आहे. यामुळे हरकती नोंदविण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते. त्यानंतर निपाणी तालुक्यातून ३४ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
निपाणी तालुक्यात असलेल्या सहा जिल्हा पंचायत मतदार संघांपैकी पाच जिल्हा पंचायत मतदार संघांतून ३४ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. अकोळ जिल्हा पंचायत मतदार संघातून ७ जणांनी हरकत नोंदवली आहे तर सौंदलगा जिल्हा पंचायत मतदार संघातून ५, कोगणोळी जिल्हा पंचायत मतदार संघातून सर्वाधिक ९, बेडकिहाळ जिल्हा पंचायत मतदार संघातून ८ हरकती तर कारदगा जिल्हा पंचायत मतदार संघातून ४ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडे लक्ष
दि. १ जुलै रोजी आरक्षण जाहीर केल्यानंतर ८ दिवसात यावर हरकती नोंदविण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते. काँग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. आता तालुक्यातून ३४ हरकती आल्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.