कोल्हापूर : कच्चा माल, कागद, प्लेट, केमिकल आदीच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे मुद्रण व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे आज, गुरुवारपासून मुद्रण दरात ३५ टक्के वाढ करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मुद्रक संघाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष संजय थोरवत होते.
श्री लाॅन येथे झालेल्या या बैठकीसाठी इचलकरंजी शहर मुद्रण संघटनेसह कोल्हापुरातील बहुतांशी मुद्रक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाचे सचिव निहाल शिपूरकर म्हणाले, काही व्यावसायिक स्पर्धेमुळे छोट्या ऑफसेट मशीनवर हजारी शंभर रुपये छपाई दर आकारतात. मात्र कित्येक मोठ्या मशीनचे मालक आजही शंभर रुपये घेत नाहीत, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे सरसकट एकूण दरात वाढ झाली पाहिजे. अशाच पद्धतीने इचलकरंजी परिसर मुद्रक संघाचे अध्यक्ष विनोद मद्यावगोळ यांनी मांडले. अध्यक्ष थोरवत म्हणाले, वाढीव दरासोबत उत्तम दर्जा आणि सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे मुद्रकांनी त्याकडेही लक्ष द्यावे. यानिमित्त सर्वानुमते ३५ टक्के मुद्रण दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष अभिजित पडवळे, कार्यवाहक सुनील नसिराबादकर, संचालक प्रकाश करंबळकर, अंजूम तांबोळी, रणजित पोवार, ओंकार चव्हाण, सिद्धेश पाटील, कुणाल पाटील, संजय रणदिवे, माजी अध्यक्ष प्रदीप पडवळे, मानसिंग पानसकर, सतीश पाध्ये, स्वानंद गोसावी, अनिल मोहिते आदी संचालक पदाधिकारी उपस्थित होते.
(फोटो स्वतंत्र पाठवत आहे)