कोल्हापूर : उपनगरांतील मंडळांनी मूर्तिदान उपक्रमास प्रतिसाद दिल्याने गुरुवारी कोटितीर्थ येथे ३५, तर राजाराम तलाव येथे २५ गणेशमूर्तींचे दान करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे निर्माल्य दान करून पर्यावरण चळवळीला बळ दिले. गणेशमूर्ती दान करणाऱ्या मंडळांना महापालिकेच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येत होते. दोन्ही ठिकाणी मंगलमय व शांततेमध्ये सार्वजनिक गणेशमूर्र्तींचे विसर्जन करण्यात आले. राजाराम तलाव येथे उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गडमुडशिंगी, मोरेवाडी, आर. के. नगर, दौलतनगर, सम्राटनगर, राजारामपुरी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर परिसरातील मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यांपासून लगबग सुरू होती. राजाराम तलाव येथे मनपा प्रशासनाच्यावतीने मूर्तिदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. या ठिकाणी दान केलेल्या गणेशमूर्ती ठेवण्यासाठी विशेष मंडप उभारण्यात आले होते. दुपारी एकनंतर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली. रात्री बारापर्यंत या ठिकाणी २५ तरुण मंडळांनी, तर ३४ घरगुती गणेशमूर्र्तींचे दान केले. या ठिकाणी पोलिस प्रशासनातर्फे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच अग्निशामक दलाचे फायरमन गणेश लकडे, नीतेश शिनगारे, दौलत रावराणे तैनात होते. रात्रीपर्यंत लहान-मोठ्या अशा ८५ गणेशमूर्र्तींचे विसर्जन करण्यात आले. कोटितीर्थ तलाव येथे राजारामपुरी परिसर, शाहूपुरी, जवाहरनगर, सम्राटनगर, यादवनगर, लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ येथील बहुतांशी मंडळांनी या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी मनपाच्यावतीने मूर्तिदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते येत होते. या ठिकाणी ३५ मंडळांनी, तर १०० घरगुती गणेशमूर्तींचे दान करण्यात आले, तर ६७ मोठ्या मूर्तींचे विसर्जन कोटितीर्थ येथे करण्यात आले. (प्रतिनिधी)निर्माल्य दान १०० टक्के....‘पुरोगामी विचारांचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात गेल्या काही वर्षांत गणेशमूर्ती दान व निर्माल्य दान या उपक्रमाला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणप्रेमी, महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या आवाहनाला आणि सातत्याने राबवित असलेल्या पर्यावरण प्रबोधनाच्या उपक्रमामुळे यंदा अनेक मंडळांनी निर्माल्य दान उपक्रमास १०० टक्के प्रतिसाद दिला. मंडळांकडून समाधान....कोटितीर्थ व राजाराम तलाव येथे गणेशमूर्ती दान करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने मंडप उभारले होते. गणेशमूर्ती दान करणाऱ्या मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येत होते. यासह या ठिकाणी प्रशासनांच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या या व्यवस्थेबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत होते.
‘कोटितीर्थ’वर ३५, ‘राजाराम’वर २५ मूर्तिदान
By admin | Published: September 17, 2016 12:27 AM