जयसिंगपूर : शहरातील शिरोळवाडी रोडवर असणाऱ्या शिवाजी हौसिंग सोसायटीमधील फोटो लॅब व घराला शॉटसर्किटने आग लागून सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शिरोळवाडी रोडवर जगदीश बाळासाहेब पाटील यांचे यशवंत डिजिटल कलर लॅब आहे. मध्यरात्री इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेत लॅबमधील फर्निचर, संगणक, फोटो प्रिंटिंग पेपर, मशीन, लॅपटॉप, फोटोग्राफरचे तयार अल्बम, चार कॅमेरे, तसेच घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. आगीच्या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली असून, या घटनेत सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
-
चौकट - अनर्थ टळला
जगदीश पाटील हे पत्नी, मुलांसमवेत लॅबच्या वरील बाजूस असणाऱ्या पहिल्या मजल्यावर झोपी गेले होते. मध्यरात्री अचानक आग लागून धूर पसरला होता. पाटील कुटुंबीय शिडीवरून पाठीमागील बाजूने खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला.
फोटो - १३०३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे आग लागून फोटो लॅब व घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले.