कोल्हापूर : जिल्ह्यात विविध रुग्णालयांत उपचार घेणारे ३५ रुग्ण सोमवारी कोरोनामुक्त झाले तर त्याचवेळी नवीन २६ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने आता केवळ २५१ रुग्ण उपचार घेत आहेत.
साेमवारी जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी दोन, हातकणंगले तालुक्यात तीन, करवीर व शिरोळ तालुक्यांत प्रत्येकी एक तर कोल्हापूर शहरात अकरा रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार १८६ वर पोहोचली असून ४७ हजार २४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत मृत्यू होण्याऱ्यांची संख्या १६८७ वर गेली आहे.
जिल्ह्यात काेरोना संसर्ग झपाट्याने कमी झाला असून नवीन रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे सर्वच शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतील चित्र एकदम पालटले आहे. कोरोनासह अन्य रोगांवरदेखील उपचार नियमित तसेच सुरळीत सुरू झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांमधील भीती कमी झाली. नागरिकांची दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरू असले तरी पुन्हा संसर्ग होणार नाही याची पुरेपुर काळजी त्यांच्याकडून घेतली जात आहे.
आरोग्य प्रशासनसुद्धा संभाव्य दुसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. महानगरपालिका व पोलीस यांच्यामार्फत शहरात गस्त सुरू असून विनामास्क व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे मास्क वापरण्याबाबत नागरिक जागरूक आहेत.