खावटी अनुदानासाठी जिल्ह्यात ३५० लाभार्थी पात्र
कुरुंदवाड : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने जाहीर केलेल्या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्यातील ३५० लाभार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये चंदगड, करवीर, गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांतील आदिवासी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, अपंग, विधवा, परितक्त्या यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये बँक खात्यावर व दोन हजार रुपयांची जीवनावश्यक वस्तू स्वरूपात दिली जाणार आहे. कोरोनामुळे अनेक घटकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आदिवासी समाजातील गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासनाने खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. योजनेचे लाभ पोहोचविण्याकरिता कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, घोडेगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे कार्यरत असून या कार्यालयाकडून पात्र आदिवासी लाभार्थी शोधमोहीम राबविण्यात आली होती.
सर्वेक्षणात कोळी महादेव जमातींच्या लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुत्नाळ (गडहिंग्लज), कामेवाडी (चंदगड), शिरोळ, हातकणंगले येथे स्थानिक आदिवासी समाजाकडून सर्वेक्षणासाठी आलेल्या समितीचे स्वागत केले. जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा या योजनेत समावेश करण्यासाठी आण्णासाहेब शिरगांवे, बसाप्पा गुडशी, संजय गोणी, महादेव व्हकळी, रमेश कोळी, दिलीप शिरढोणे, अविनाश कडोले, अशोक कोळी, आदींनी विशेष प्रयत्न केले.
कोट - पात्र आदिवासी लाभार्थी संख्या ही जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यामुळे येथून पुढील काळात तरी जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका बदलून स्थानिक आदिवासींना त्यांचे घटनात्मक हक्क देऊन राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत.
- प्रा. बसवंत पाटील, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय कोळी समाज