कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात २०१६-१७ या अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपयांची १४० कामे प्रस्तावित केली आहेत. यामध्ये ३४५ किलोमीटर लांबीचे रस्ते सुधारणा, ८ नद्यांवरील मोठे पूल, २३ लहान पूल व एक उड्डाणपुलाचा समावेश असेल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने विविध लोकाभिमुख योजना राबवून दोन वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुती सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोमवारी पाडव्यादिवशी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने चांगले लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये एलबीटीमुक्ती, बहुतांश ठिकाणी टोलपासून दिलासा, ओबीसीची क्लिमीलेयरची मर्यादा ४ लाखांवरून ६ लाखांवर नेली. ‘ईबीसी’सवलतीची मर्यादाही एक लाखांवरून ६ लाखांवर नेली, जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याने देशातील प्रत्येक राज्याने ती स्वीकारली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे सुचेल ते सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. ते पुढे म्हणाले, जिल्हास्तरावरही जनतेला सुखावह करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. कोल्हापूरचा टोल रद्द करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. ४५९ कोटी रुपये शासन कंपनीला देणार असून टोलविरोधी आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर बारा वर्षांनी येणाऱ्या कन्यागत महापर्वकाल सोहळ्यासाठी शासनाने १२१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ६५ कोटी इतका निधी घाटांची उभारणी, पालखी मार्ग, रस्ते, पार्किंग, विद्युतीकरण आदी कामांवर खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ६९ गावांसाठी ३६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. ८ हजार ९०० टीएमसी पाणी साठवणूक क्षमता निर्माण करून ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आणण्यात आली. ऐतिहासिक कळंबा तलावातील गाळ काढल्याने २५ कोटी लिटर्सचा वाढीव पाणीसाठा तयार झाला आहे. महाराजस्व अभियानांतर्गत २ लाख २ हजार २६३ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. दोन वर्षांत ९१६ अतिक्रमित पाणंद रस्ते मुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, मुद्रा योजना, ऊस उत्पादकता वाढ अभियान मृदा आरोग्य, सहकारी संस्थांमध्ये गुणात्मक वाढ करण्यासाठी प्रयत्न केला आहे. कोल्हापूरची ई-डिस्नीक प्रणाली राज्यभर लागू जिल्हा प्रशासनाकडून विकसित करण्यात आलेली ई-डिस्नीक ही ‘महसूल’चे कामकाज सोपे करणारी प्रणाली राज्यातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आली. ५४७ कार्यालयांमधून या प्रणालीचा अवलंब केला जात असून ई-गोडावून मॅनेजमेंट, ई-जमाबंदी, ई-रिकव्हरी, ई-भूसंपादन, ई-पुनर्वसन, ई-निवडणूक, दुसऱ्या महायुद्धातील सैनिक/विधवांसाठी ई-पेन्शन हे सर्व विषय आॅनलाईन करण्यात आले आहेत.
३५० कोटींचे होणार रस्ते, पूल
By admin | Published: November 02, 2016 1:16 AM