संदीप खवळे / कोल्हापूर सातारा ते पुणे दरम्यानच्या शंभर कि.मी.च्या टप्प्यात सुमारे साडेतीनशे जर्मन कंपन्या़. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, फोक्स वॅगन, औषध क्षेत्रातील मर्क ही काही त्यातील प्रातिनिधिक उदाहरणे़़ जर्मन भाषेच्या प्रसारासाठी या उद्योगांना जर्मनी सरकारने दिलेली खास कर सवलत, अशा अनेक संधी घेऊन जर्मन उद्योगजगत जर्मन आणि इंग्रजी भाषा अवगत असलेल्या उमेदवारांच्या शोधात आहे़ व्यावसायिक शिक्षणाबरोबच जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेल्या युवकांना करिअरचा हा राजमार्गच आहे़ प्रशासन, मार्केटिंग, व्यवस्थापन या क्षेत्रांत पाच लाखांच्या घरातील पॅकेजेस जर्मन कंपन्या देत आहेत़ आपले औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंध भारतामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी जर्मनीने अनेक सांस्कृतिक केंद्रे महाराष्ट्रात सुरू केली आहेत़ यापैकी पुणे येथील मॅक्समुलर भवन हे एक प्रमुख केंद्र आहे़ या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा येथे जर्मनीने आपले औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंधाचे जाळे निर्माण केले आहे़ जर्मन भाषेचा प्रसार करण्यासाठी ही सांस्कृतिक केंद्रे सुरू करण्यात आली आहेत़ देशभरातील जर्मन कंपन्यांमध्ये जर्मन, इंग्रजी आणि स्थानिक भाषा येणाऱ्या युवकांना चांगली पॅकेजेस दिली जातात़ सातारा ते पुणे या पट्ट्यात आॅटोमोबाईल आणि औषध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या मार्केटिंग आणि प्रशासनामध्ये जर्मन भाषा अवगत असलेल्या स्थानिक युवकांना प्राधान्य देत असतात़ कार्पोरेट लॉबिंग, प्रशासन आणि स्थानिक प्रश्नांची चांगली जाण असलेल्यांना या कंपन्यामध्ये आकर्षक पॅकेजेस आहेत़ जर्मनीतील वरिष्ठ उद्योजकांची दर आठवड्याला या कंपन्यांमध्ये फेरी असते. पुणे ते जर्मनीतील फ्रँकफुर्ट येथे थेट विमान सेवेची सोय पुण्यातील विमानतळावरून उपलब्ध आहे़ जर्मन अधिकाऱ्यांना स्थानिक भाषेची अडचण असल्यामुळे उद्योगधंद्यांशी संबंधित अनेक प्रशासकीय बाबींसाठी जर्मन भाषा येत असलेल्या युवकांची गरज भासते़ ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक स्तरावर या भाषेचे प्रशिक्षण देण्याची सोयही पुणे येथे या कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे़
सातारा-पुणे दरम्यान ३५० जर्मन कंपन्या
By admin | Published: November 23, 2014 12:33 AM