उद्धव गोडसेकोल्हापूर : अपयश, नैराश्य, अपेक्षाभंग आणि नकारात्मक मानसिकतेमुळे आयुष्यापासून पळ काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. किरकोळ कारणातून थेट तणनाशक प्राशन करणे आणि गळफास घेण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: आयुष्याला आव्हान देऊन जिद्दीने उभे राहण्याची क्षमता असलेली तरुणाईच क्षुल्लक कारणातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात ३५० जणांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. अलीकडे आत्महत्यांची संख्या वाढत असल्याने ही नवी सामाजिक समस्या बनत आहे.आठ महिन्यांत ३५० आत्महत्याजिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३५० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद सीपीआरमध्ये झाली. ग्रामीण भागात तणनाशक प्राशन करून, तर शहरी भागात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात तरुणांची संख्या चिंताजनक आहे.
आत्महत्येची प्रमुख कारणे काय?प्रेमभंग : प्रेमात अपयश आले. ऐनवेळी लग्नाला किंवा प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. नातेवाइकांनी प्रेम विवाहास विरोध केल्याच्या कारणातून तरुणांच्या आत्महत्या होतात. विशेष म्हणजे यात तारुण्याच्या उंबरठ्यावरील अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.अपेक्षाभंग : २० ते ४० वयोगटातील बहुतांश व्यक्तींच्या आत्महत्या अपेक्षाभंगातून होतात. शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळाली नाही. मिळालेली नोकरी सुटली. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही. शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याच्या कारणातून आत्महत्या होतात.नैराश्य : सतत येणारे अपयश, आर्थिक कोंडी, बेकारी, नातेवाइकांकडून असलेल्या अपेक्षा आणि समाज काय म्हणेल, या चिंतेतून नैराश्य वाढते. नैराश्याचे योग्य व्यवस्थापन करता न आल्याने अनेकांच्या आत्महत्या होतात.
लहान वयात आत्महत्या ?आत्महत्या करणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांमध्ये व्यवस्थेबद्दल उदासीनता वाढते. परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी ते मानसिकदृष्ट्या हार स्वीकारून आत्महत्या करतात.
महिलांची मानसिकता कणखरनोकरी आणि कुटुंब सांभाळणे, लग्नानंतर होणारा अपेक्षाभंग, व्यसनी पती आणि मुलांना सांभाळून घेणे अशा अनेक आघाड्यांवर महिलांना कसरत करावी लागते. तरीही महिला शक्यतो हार मानत नाहीत. परिस्थिती सुधारेल या सकारात्मक मानसिकतेमुळे त्या आत्महत्येचा विचार करीत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी आहे.
नकारात्मक मानसिकता आणि वाढत्या अपेक्षा यामुळे आत्महत्येचे विचार बळावतात. कुटुंबीयांशी सुसंवाद आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते. - कालिदास पाटील - मानसोपचार तज्ज्ञ