गडहिंग्लज :
दिवाळीनंतर सुटलो एकदाचे म्हणून सर्वच ठिकाणी नागरिकांनी नि:श्वास सोडला. त्यानंतर तब्बल चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कोरोना पुन्हा पूर्वपदावर आला आहे. गडहिंग्लज तालुक्यात महिन्याभरात ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
गडहिंग्लज शहरातील प्रभाग ८, प्रभाग ९ सह शिवाजी चौक परिसर हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यातील हसूरचंपू, येणेचवंडी, बुगडीकट्टी, दुंडगे, हणमंतवाडी, इंचनाळ, करंबळी, महागाव, कळविकट्टे, बसर्गे, मुंगूरवाडी, नांगनूर, तेरणी, मुत्नाळ ही गावे हॉटस्पॉट बनली आहेत.
बाधित रुग्णांपैकी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात ३०, शेंद्री माळावरील कोविड सेंटरमध्ये ५५, खासगी रुग्णालयात ५७, तर ११९ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. महिनाभरात बाधितांपैकी ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील करंबळी व महागांवमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने नियमांचे पालन करावे यासाठी महागावात गुरुवारी (दि. २२) धडक कारवाई करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे. शहरातही मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व नगरसेवकांनी कोरोना जनजागृतीची मोहीम सुरू केली असून पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी शहरात व तालुक्यातील प्रवेश नाक्यांवर बंदोबस्त ठेवला आहे.