प्रकाश पाटील-- कोपार्डे जनावरांचे आरोग्य सुदृढ व्हावे, दूध उत्पन्न वाढावे, पशुपालकांची संख्या वाढून दर्जेदार उत्पादनासाठी दूध व पूरक उत्पादने वाढावीत यासाठी यंदाही जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामधेनू ग्रामदत्तक योजना राबवली जाणार आहे. चालू वर्षात राज्यातील दोन हजार ४०२ गावांची निवड केली असून, यासाठी ३६ कोटी ६० लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत गावच्या संख्येत घट झाली आहे. कामधेनू ग्रामदत्तक योजनेतून प्रत्येक गावाला एक लाख ५२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या गावांची निवड करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांचा समावेश असणार आहे. या योजनेतून जनावरांमध्ये वांझपणा येण्याची कारणे, वांझ तपासणी शिबिर, प्रतिबंधात्मक उपाययोजना , गोचीड प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप, जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था, पशुपालकांसाठी प्रबोधनात्मक सहल, चाऱ्यावर प्रक्रिया, चारा व्यवस्थापनासाठी हायड्रोफोनिक किंवा आझोला चाऱ्यांची निर्मिती करणे, मुरघास प्रकल्प राबविणे, असे उपक्रम राबविले जाणार आहेत. प्रत्येक गावात पशुपालक मंडळ स्थापन करून त्यांची नोंदणी, सहलीसाठी सात हजार, जंतनाशक शिबिरासाठी १७ हजार ५००, खनिजद्रव्य मिश्रण व जीवनयुक्त पुरवठा ४० हजार, गोचीड, गोमाशी निर्मूलनासाठी १३ हजार, वंधत्व निदान व औषधोपचारासाठी २२ हजार, वैरण विकास कार्यक्रमासाठी १७ हजार रुपये, निकृष्ट चारा सकस करण्यासाठी पाच हजार, नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी पाच हजार, मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत करणे प्रशिक्षणासाठी निधी असणार आहे. गावांच्या संख्येत घट यापूर्वीही जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ मध्ये कामधेनू दत्तक योजनेसाठी तीन हजार ३५१ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ५१ कोटी १० लाख ३४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ९४९ गावे यावर्षी कामधेनू दत्तकग्राम योजनेतून कमी करण्यात आली आहेत.
‘कामधेनू’ दत्तक ग्राम योजनेसाठी ३६ कोटींचा निधी
By admin | Published: October 11, 2015 11:26 PM