कोल्हापूर : डॉल्बीचा दणदणाट, विविध रंगी लेझर शोनी उजळून निघालेला आसमंत, अखंडपणे संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईचा जल्लोष, पारंपरिक वाद्यांपासून झांज, बेंजो, ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेपासून मर्दानी खेळांपर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाच्या प्रयत्न, अशा अपूर्व जल्लोष आणि उत्साहात रंगलेला गणेश विसर्जन सोहळा तब्बल ३६ तास रंगला. यंदा चार मंडळांनी प्रथमच दुसऱ्या दिवशी मिरवणुका काढल्या. बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी व न्यू महाद्वार रोडवर झालेले किरकोळ वादाचे प्रकार वगळता मिरवणूक शांततेत पार पडली.पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांवर कोणत्याही प्रकारचे दबावतंत्र न वापरता ज्यांना जायचे तसे जाऊ द्या, अशी भूमिका स्वीकारल्यामुळे मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडलीच शिवाय पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात नेहमी दिसणारा वाद यंदा पाहायला मिळाला नाही. पोलिसांनी रात्रीपर्यंतचा बंदोबस्तही तणावमुक्त वातावरणात केला. विशेष म्हणजे अनेक पोलीस विनागणवेश बंदोबस्तात सहभागी झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि महापौर वैशाली डकरे, जिल्हाधिकारी अमित सैनी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी नऊ वाजता खासबाग मैदान येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक अखंडपणे ३६ तास सुरू होती. काही मंडळांनी सोमवारी स्वतंत्रपणे मिरवणूक काढल्यामुळे वेळेची विक्रमी नोंद झाली. छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळाचा महागणपती, लेटेस्ट तरुण मंडळ तसेच शाहूपुरीतील शिवतेज तरुण मंडळ यांनी सोमवारी स्वतंत्र मिरवणुका काढल्या रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत शहरातील पंचगंगा नदी, राजाराम बंधारा, इराणी खाण, कोटितीर्थ तलाव, राजाराम बंधारा आदी ठिकाणी मिळून एकूण ९८६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विशेष म्हणचे यंदा मोठ्या मूर्ती दान करण्यातही मंडळांनी पुढकार घेतला. २६९ मूर्ती मनपा प्रशासनाने दान म्हणून स्वीकारल्या. यंदाच्या गणेशोत्सवाला मनपा निवडणुकीची झालर लागल्यामुळे धुमधडाक्यात मिरवणूक निघणार हे अपेक्षित होते. पंचवीसहून अधिक मंडळांनी मोठ्या आवाजाचे डॉल्बी आणले होते, तसेच लेसर शो आणले होते. त्यामुळे कायद्याचे निर्देश कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे निष्प्रभ ठरले; परंतु बहुतांशी मंडळांनी आपला पारंपरिक बाज जपला. धनगरी ढोल-ताशे, लेझीम, बॅँड, झांज आदी पारंपरिक वाद्यांचाही मोठा बोलबाला राहिला. मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांत महिलांनीही मोठ्या संख्येने भाग घेऊन या क्षेत्रातील आपला सहभाग नोंदविला. नऊवारी साड्या, नाकात नथ, केसाचे आंबाडे बांधलेल्या महिलांनी झिम्मा-फुगडीचे फेर धरत आपल्या सहभागाची नोंद केलीच शिवाय मिरवणुकीतील पारंपरिक बाजही जपला. मूर्ती दानला उत्स्फूर्त प्रतिसाद शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाने डॉल्बीला फाटा देत मिरवणुकीत सहभागी होऊन मूर्तीचे विसर्जन न करता ती दान करून नवा आदर्श घालून दिला आहे. त्याबरोबरच संभाजीनगर तरुण मंडळ, महानगरपालिका, विद्यार्थी कामगार मंडळ, गोल्डस्टार स्पोर्टस्, काळाईमाम तालीम मंडळ, कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळ, राजमाता तरुण मंडळ, सर्वाेदय मित्र मंडळ, न्यू सदर बाजार तरुण मंडळ, रोहिडेश्वर तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, इंद्रप्रस्थ तरुण मंडळ, क्रांतिवीर राजगुरु तरुण मंडळ, सोल्जर तरुण मंडळ, शिपुगडे तालीम मंडळ, निवृत्ती तरुण मंडळ, भोई गल्ली तालीम मंडळ, शाहूपुरी युवक मंडळ, रविवार पेठ तरुण मंडळ आदींसह १४०हून अधिक तरुण मंडळांनी मूर्ती दान केल्या.‘तटाकडील’चे वेगळेपणशिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाने यंदा मुंबईहून लोकनृत्य करणाऱ्या कलाकारांचे पथक आणले होते. लोकनृत्याने मिरवणुकीत बहार आणली.
विसर्जन सोहळा ३६ तास
By admin | Published: September 29, 2015 1:03 AM