राम मगदूम ।गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ३७ गावांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या तब्बल ३७ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकरिता सुमारे ८२ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
गडहिंग्लज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १२८ शाळा आहेत. त्यापैकी ३७ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे शाळांच्या छतांची कौले फुटली आहेत. अनेक शाळांची दारे-खिडक्या व खिडक्यांच्या तावदानांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. कळविकट्टे, नौकुड, खणदाळ, दुग्गूनवाडी, माद्याळ, कडगाव, निलजी, लिंगनूर, कसबा नूल, करंबळी, शिप्पूर तर्फ आजरा, जरळी (नाईकवाडी), ऐनापूर, तेरणी, गिजवणे व हट्टीबसवाण्णा या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.
तारेवाडी, तावरेवाडी, इदरगुच्ची, हनिमनाळ, मनवाड, अर्जुनवाडी, गिजवणे, बिद्रेवाडी, सरोळी, दुंडगे, वाघराळी, तेरणी, हिरलगे, उर्दू शाळा हलकर्णी, भडगाव, जरळी, कुमरी, डोणेवाडी, सांबरे, चंदनकुड, हसूरचंपू व काळामवाडी येथील शाळांच्या वर्गखोल्यादेखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
नेसरी परिसरातील मरणहोळनजीकच्या लमाणवाड्यात नव्याने सुरू झालेली प्राथमिक शाळा गावचावडीत भरते. त्या ठिकाणी नवीन शाळा इमारत उभारण्याची गरज आहे. परंतु, पटसंख्येच्या अटीमुळे या शाळेसाठी स्व:मालकीची इमारत बांधणे अडचणीचे झाले आहे.खणदाळ या ठिकाणी सहा, तर यमेहट्टी येथे एक वर्गखोली बांधण्याची गरज आहे. दोन्ही गावांतील मिळून सात वर्गखोल्यांसाठी सुमारे ६० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. नौकुड व खणदाळ येथील ग्रामस्थांनी नादुरुस्त खोल्यांच्या दुरुस्तीसाठी आंदोलनही केलेहोते. किमान नादुरुस्त खोल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.सर्व शिक्षा अभियानातून प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात येणारा निधी तीन वर्षांपासून तालुक्याला मिळालेला नाही. म्हणूनच शाळा दुरुस्तीची कामे रखडली आहेत.गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या विशेष शाळा दुरुस्ती निधीतून तालुक्यातील १६ शाळांची विशेष दुरुस्ती झाली; परंतु ती केवळ मलमपट्टीच ठरली आहे. त्यामुळे नादुरुस्त सर्वच शाळा खोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.नादुरुस्त वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. नादुरुस्त वर्गखोल्यांमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित शाळांना दिल्या आहेत.- रमेश कोरवी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, गडहिंग्लज.