आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात सर्वांसाठी घरे देण्याच्या योजनेअंतर्गत १९० झोपडीधारकाना पक्क्या स्वरुपाचे घर देण्यात येणार आहे. तसेच शहरी गरीब नागरीकांना परवडणाऱ्या दरातील ३७६ घर उपलब्ध होतील त्यापैकी २८२ घरे ही महापालिकेच्या सफाई कमर्चाऱ्यांना दिली जाणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून २०२२ सालापर्यंत सर्वांना घरे दिली जाणार आहेत. त्याअंतर्गत अंतर्गत पहिल्या दोन सविस्तर प्रकल्प अहवालांचे सादरीकरण महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पदाधिकारी व अधिकारी यांचे समोर करण्यात आले. त्यावेळी ही मांिहती देण्यात आली. प्रारंभी आयुक्त पी. शिवशंकर यांनी सादरीकरण आयोजीत करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण शहराचा सर्वासाठी घरे कृती आराखडा बनवून राज्य शासनास सादर करणे अत्यावश्यक असून शहराचा आराखडा तयार झाला आहे. सर्व पदाधिकारी व सदस्य यांना तो पूर्ण माहित असणे आवश्यक असल्याने तो सादर केला, असे आयुक्तांनी सांगितले. राज्यात कोल्हापूर व नागपूर ही दोनच शहरे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीमध्ये अग्रेसर असल्याचे सांगून महाराष्ट्रात कृती आराखडा सादर करणारी कोल्हापूर महानगरपालिका पहिली असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सदर सविस्तर प्रकल्प अहवालाची माहिती दिली. त्यानंतर सल्लागार संस्था व्ही.आर.पी. असोसिएशनच्या अध्यक्षा मेघा गवारे यांनी आराखडयाचे सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये शहरातील झोपडपट्टया आणि त्याव्यतिरिक्त शहरात असणारा बेघर या दोन्ही घटकांची पक्क्या घरांची गरज, योजनेच्या माध्यमातून चार घटकामधून मिळणारी पक्की घरे, आवश्यक असणारा निधी, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राची भागीदारी, सन २०२२ पर्यंत टप्प्या-टप्याने योजनेची अंमलबजावणी, इत्यादी सर्व बाबींवर सविस्तर माहिती दिली. या दोन सविस्तर प्रकल्प अहवालापैकी एक प्रकल्प अहवाल हा झोपडपट्टीचा ‘आहे तेथेच’ पुर्नविकास करणे यामध्ये बोंद्रेनगर व कदमवाडी झोपडपट्टीचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकल्प अहवालामध्ये कामगार चाळ व कदमवाडी येथे परवडणाऱ्या दरातील घरांची निर्मिर्ती करणे याचा समावेश केलेला आहे.
नगरसेवक संतोष गायकवाड, विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका कविता माने यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन मेघा गवारे यांनी केले. यावेळी महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, महिला बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, परिवहन समिती सभापती नियाज खान, प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, नगरसेवक अशोक जाधव, कमलाकर भोपळे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, माजी नगरसेवक आदिल फरास, सल्लागार कंपनीचे युवराज जबडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)