लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये निजामपूर (अहमदनगर) येथील रूपेश राणे या शेतकऱ्याने कांदा विक्री करून अकरा महिने झाले, तरी त्याचे ३८ हजार रुपये अडकले आहेत. त्यासाठी संबंधित शेतकरी हेलपाटे मारून कंटाळला असून, अडत्याकडून दाद दिली जात नसल्याने राणे हवालदिल झाले आहेत.
रूपेश राणे हे नियमित कोल्हापूर बाजार समितीकडे कांदा लावतात. राणे यांनी १४ मे २०२० रोजी चंदवाणी ट्रेडिंग कंपनीकडे २६३ पिशव्या (११८ क्विंटल ३५ किलो) कांदा लावला. लिलावात त्याचा दर ७९० रुपये प्रति क्विंटल निघाला. त्यानुसार ९३ हजार २२० रुपये पट्टी होते. मात्र संबंधित अडत्याने राणे यांना लवकर पैसे दिले नाहीत. चकरा मारल्यानंतर त्यातील ५५ हजार रुपये दिले. मात्र उर्वरित ३८ हजार रुपये अडकले आहेत. राणे यांनी अनेक वेळा चंदवाणी ट्रेडिंगकडे पैशाची मागणी केली, मात्र त्यांना दाद दिली जात नाही. त्यामुळे राणे यांनी बाजार समितीकडे तक्रार केली, समिती प्रशासनाने चंदवाणी यांच्याकडे खुलासा मागितला आहे. गेले अकरा महिने पैशासाठी अडत्याकडे हेलपाटे मारून कोणीच दाद देत नसल्याने राणे हवालदिल झाले आहेत.
कोट-
चंदवाणी ट्रेडिंगकडे कांदा लावला, बिलातील रकमेपैकी ३८ हजार रुपये देय असून त्यासाठी गेले अकरा महिने हेलपाटे मारत आहे. समितीकडेही तक्रार केली. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही.
- रूपेश राणे (शेतकरी, निजामपूर)
रूपेश राणे यांच्या तक्रारीनुसार चंदवाणी ट्रेडिंगकडे खुलासा मागितला असून दोघांची रुजवात घालून राणे यांना पैसे दिले जातील.
- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)