लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, संलग्न ११ हजार ४४८ सहकारी संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मागवले होते. मात्र मुळात २९७७ संस्थांनी ठरावच दाखल केले नाहीत. त्यात सहकार विभागाच्या छाननीत ९७३ संस्था प्रतिनिधी अपात्र ठरले. त्यामुळे या निवडणुकीत बँकेशी संलग्न ३९५० संस्था मतदान प्रक्रियेपासून अलिप्त राहणार आहेत.
जिल्हा बँकेने केेलेल्या आवाहनानुसार विहीत मुदतीत केवळ ८५७१ संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव सहकार विभागाकडे दाखल झाले. तब्बल २९७७ संस्थांनी आपल्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दाखल केले नाहीत. दाखल ठरावांची छाननी जिल्हा बँकेच्या पातळीवर करण्यात आली. त्यानंतर बँकेने ही यादी सहकार विभागाकडे दिली. सहकार विभागाने तालुकानिहाय सहायक निबंधकांकडे छाननीसाठी पाठवले. अवसायन, नोंदणी रद्द व थकबाकीदार संस्था आहेत का? याची छाननी केली. यामध्ये ९७३ संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे आता शुक्रवारी, सकाळी अकरा वाजता ७५९८ संस्था प्रतिनिधींच्या नावांची प्रारूप यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या यादीवर १३ सप्टेंबरपर्यंत हरकती घेतल्या जाणार आहेत. प्राप्त आक्षेपांवर सुनावणी घेऊन विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था हे २२ सप्टेंबरपर्यंत अंतिम निकाल देऊ शकतात. २७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडू शकते.