राम मगदूम
गडहिंग्लज : कोरोनामुळे सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या निधीतून येथील उपजिल्हा रुग्णालयात (१०० खाटांचा दवाखाना) सुमारे ४ कोटींच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. किंबहुना कोरोनाच्या संकटामुळेच दवाखाना परिपूर्ण होण्यास मदत झाली आहे.
२००५ मध्ये सुरू झालेला हा दवाखाना गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड व कागलच्या कापशी खोऱ्यासह सीमाभागातील गरिबांना वरदान ठरला आहे. दररोज सुमारे ३०० बाह्य रुग्णांवर उपचार आणि महिन्याकाठी १५० प्रसूती होणाऱ्या या दवाखान्यात अनेक गोष्टींची कमतरता होती. त्यापैकी बहुतेक बाबींची पूर्तता कोरोनामुळे झाली.
मंडलिक प्रतिष्ठानकडून दवाखान्याला बेबी वॉर्मर, इन्क्युबीटर, २ मल्टी पॅरा मॉनिटर आणि वातानुकूलित मशीन्स, विद्या प्रसारक मंडळाकडून ६ फाऊलर बेडस व अन्य एनजीओकडून २ मल्टी पॅरा मॉनिटर्स मिळाले आहेत. गडहिंग्लज विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑगस्ट ते नोव्हेंबरअखेर कोविड रुग्णालय म्हणून या दवाखान्याची घोषणा झाली. या काळात सुमारे ७०० कोरोनाबाधितांवर उपचार केले. त्यानंतर ५० बेड कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवून ५० बेड अन्य रुग्णांसाठी खुले केले आहेत.
...........
* ऑक्सिजन जनरेशन प्लॅंट
५६ लाख रुपये खर्चून दवाखाना परिसरात ऑक्सिजन जनरेशन प्लॅंट उभारला आहे. प्रतिदिन १२० ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती इतकी त्याची क्षमता आहे. ५६ बेडसना सेंट्रल ऑक्सिजन पाईपलाईनची सुविधा झाली. पूर्वी केवळ दोनच व्हेंटिलेटर होते. आणखी ५ व्हेंटिलेटर, ६ हायफ्लो ऑक्सिजन मशीन व ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, १८० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर व ४ ड्युरा सिलिंडर मिळाले.
.............
२०० खाटांची सुविधा आवश्यक
डायलेसिस व ‘आयसीयु’ युनिट आणि ऑपरेशन थिएटर वातानुकूलित झाले. ५ बेडचे ‘आयसीयु’ युनिट तयार झाले. ‘सीटी स्कॅन’ मशीनला मंजुरी मिळाली. याठिकाणी उपचाराला घेणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्याचे १००बेडस अपुरे पडत आहेत. त्यामुळे श्रेणी वाढवून दवाखान्यात २०० खाटांची सुविधा करायला हवी.
( फोटो - १२ गड हॉस्पिटल
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय