आजरा : शिरसंगी (ता. आजरा) येथे जंगल विभागाच्या ''''लक्ष्मी डाग'''' नावाच्या क्षेत्राला लागलेल्या आगीत ४ लाखांचे नुकसान झाले आहे. आगीत १ लाख पेंढ्यांचे उभे गवत व ३ हजार कापलेल्या गवताच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत. ही घटना सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.
शिरसंगी-कागिनवाडी व मलिग्रे गावाच्या दरम्यान लक्ष्मी डाग नावाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राला लागून खासगी मालकीचे क्षेत्रही आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास अचानक आग लागली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीच्या आवाजाने खासगी क्षेत्रात गवत कापण्यासाठी गेलेल्या शिरसंगी व कागीनवाडीच्या ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तब्बल अडीच तास आगीचा तडाका सुरूच होता. त्यातच वारे असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. १०० ते १२५ तरुणांच्या समूहाने झाडांच्या पाल्याने ही आग आटोक्यात आणली.
आगीमध्ये खासगी क्षेत्रातील पांडुरंग टक्केकर यांची कापलेले २ हजार तर शंकर सावंत यांचे १ हजार गवत पेंढ्या जळाल्या आहेत. आगीमध्ये वनविभागाची वृक्षसंपदाही नष्ट झाली आहे. आगीमध्ये २२ ते २५ एकरांमधील उभे गवत जळाले आहे.
--------------------------------
फोटो ओळी : शिरसंगी (ता. आजरा) येथील गवताला लागलेली आग विझविताना ग्रामस्थ.
क्रमांक : २८१२२०२०-गड-०३