संदीप आडनाईककोल्हापूर : जगातील सर्वात लहान गिर्यारोहकाचा मान पटकावणाऱ्या कोल्हापुरातील ४ वर्षे ७ महिन्यांची अन्वी चेतन घाटगे ७ एप्रिलपासून ११ एप्रिलपर्यंत सह्याद्री पर्वतरांगेतील चार सर्वोच्च शिखरांवर चढाई करणार असून, तेथे ती कोल्हापूरची गुढी रोवणार आहे. अन्वी गुरुवारी या मोहिमेवर रवाना झाली असून, कोल्हापूर वनविभागाने तिला शुभेच्छा दिल्या.दोन वर्षे ११ महिन्यांची असताना अन्वीने महाराष्ट्रातील सर्वोच्च ‘कळसूबाई’ आणि ३ वर्षे ५ महिन्यांची असताना कर्नाटकातील ‘मूल्ल्यणगिरी’ हे सर्वोच्च शिखर सर करून जगातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब पटकावला आहे. तिच्या नावाची दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून अन्वी रविवार, दि. ७ एप्रिल रोजी ‘निसर्ग आणि पर्यावरण वाचवा, आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा’ असा संदेश देत सह्याद्री पर्वतरांगेतील केरळ राज्यातील अण्णामुडी आणि मिसापुल्लीमला ही दोन सर्वोच्च शिखर सर करणार आहे. याशिवाय मराठी नवीन वर्षानिमित्त गुढी पाडव्याला म्हणजे ९ एप्रिल रोजी निलगिरी पर्वत रांगेतील आणि तामिळनाडू राज्यातील सर्वोच्च शिखर दोडबेट्टा आणि क्रांतिबा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी नीलगिरी पर्वत रांगेतील तसेच तामिळनाडू राज्यातील दुसरे सर्वोच्च शिखर कोलारीबेट्टा सर करून पुन्हा एकदा जागतिक विक्रम नोंदवणार आहे. या प्रवासात तिला महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू राज्यांतील वनविभागाचे सहकार्य आहे.कोल्हापूर वनविभागाकडून बुधवारी मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन, आयएफएस जी. गुरुप्रसाद, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, समाजसेवा अधीक्षक डॉ. शशिकांत रावळ, डॉ. भावना खंदारे, डॉ. तेजल रुद्रा, महेंद्र चव्हाण यांच्यासह अक्षय कुमार फॅन क्लब कोल्हापूरचे राम कारंडे, महिपती संकपाळ, प्रा. किसनराव कुराडे यांनी अन्वीला शुभेच्छा दिल्या.
ही चार शिखरे करणार पादाक्रांत..७ एप्रिल : केरळ-अण्णामुडी (८८४२ फूट) आणि मिसापुल्लीमला (८६६१ फूट)९ एप्रिल : तामिळनाडू-दोडबेट्टा (८६५२ फूट)११ एप्रिल : तामिळनाडू-कोलारीबेट्टा (८६२९ फूट)