कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी मंजूर झालेल्या ८० कोटी रुपयांच्या निधीपैकी ४० कोटी निधीचा पुरवणी मागण्यांत समावेश झाल्याचे वृत्त आहे. जर हा निधी पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर झाला तर उर्वरित कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा होईल.कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसराचा ८० कोटींचा विकास आराखडा महाविकास आघाडी सरकार असताना मंजूर झाला असून त्यांपैकी १० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून ताराबाई रोडवर बहुमजली वाहनतळ उभारण्यात येत आहे. वाहनतळाचे काम पूर्ण होत आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात भक्तनिवास, दर्शनरांग तसेच व्हीनस कॉर्नर गाडीअड्डा येथे वाहनतळ निर्माण करण्यात येणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून निधीची उपलब्धता व्हावी म्हणून पाठपुरावा करण्यात येत आहे. ८० कोटींपैकी १० कोटींचा निधी प्राप्त झाला, तो खर्चही करण्यात आला आहे. आता उर्वरित कामे करण्यासाठी ७० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यातील चाळीस कोटींचा निधी वितरित करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. या निधीचा पुरवणी मागण्यात समावेश करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासाठी ४० कोटी मिळणार, निधीचा पुरवणी मागण्यांत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 1:40 PM