कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी नवीन ४० कोरोना रुग्णांची नोंद झाली, त्यातील २७ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत, तर कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील एका ४७ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा दर हा दुप्पट झाला आहे. रोज ४० ते ५० रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. कोल्हापूरकरांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे प्रशासनाने मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवून आपले व्यवहार पार पाडावेत याकरिता आवाहन केले आहे. मात्र, लोकांमधील भीती कमी झाली असल्याने अजूनही या नियमांची कडक अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाही.सोमवारी संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात नवीन ४० रुग्णांची नोंद झाली, त्यातील २७ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे यातील ३१ रुग्णांच्या चाचण्या या खासगी रुग्णालये व प्रयोगशाळेत झाल्या होत्या. भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यांतील प्रत्येकी एक, तर करवीर तालुक्यातील तीन व नगरपालिका हद्दीतील दोन रुग्णांचा त्यात समावेश आहे.
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या - ५० हजार ४७७
- बरे झालेल्या रुग्णांची संख्या - ४८ हजार ४१३
- आतापर्यंत बळींची संख्या - १७४५
- उपचार घेत असलेले रुग्ण - ३१९