कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्यासाठी घातलेले निर्बंध, अंनिससह विविध संस्था व शाळा-शाळांमधून फटाक्यांपासून होणाऱ्या प्रदूषणाबाबतची जनजागृती आणि वाढत्या किमती याच्या एकत्रित परिणामामुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात फटाक्यांच्या विक्रीत ४० टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा दिवाळीत फटाक्यांचा आवाज बसल्याचे प्रत्यंतर आले.
विशेषत: मोठ्या आवाजाचे सुतळी बॉम्ब, हजारांच्या माळा, गावठी बॉम्ब, १०० च्या माळांची विक्री घटली. या फटाक्यांच्याच किमती अगदी १०० रुपयांपासून काही हजारांत आहेत. त्यात ‘जीएसटी’मुळेही किमती वाढल्या. त्यामुळे यंदा फुलबाजे, भुईनळा, पाऊसकुंडी अशा फटाक्यांवर भर आहे. त्यामुळे याच फटाक्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. पूर्वी लोक फटाक्यांवर किमान दोन हजार रुपये खर्च करीत होते. आता तोच खर्च हजाराच्या आत होऊ लागल्याची भावना अनेक विक्रेत्यांनी बोलून दाखविली.
पूर्वी दिवाळी म्हटले की सकाळी उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत फटक्यांचा दणदणाट ऐकावयास मिळत होता. त्यातून कानठळ्या बसविणाºया आवाजाबरोबरच हवेचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत होते. अनेकांना दम्यासह विविध आजारांना सामोरे जावे लागे. सर्वोच्च न्यायालयानेही १२५ डेसिबलच्या खाली आवाज असलेले फटकेच वाजवावेत असे निर्बंध घातले. फटाके उडविण्यासाठी सकाळी एक तास व रात्री एक तास अशी दोन तासांचीच वेळ निश्चित केली. त्याचाही मोठा परिणाम झाला. सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांतून फटाके उडविल्यानंतरचे परिणाम व न उडविण्याविषयी जनजागृती करण्यात आली. त्यामुळे यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून फटाक्यांचा आवाज बसल्याचे चित्र आहे.या फॅन्सी फटाक्यांना मागणी अधिकयंदा नव्याने ‘फोटो फ्लॅश’ १५ ते २० वेळा चमकणारा फटाका बाजारात आला आहे. त्याच्यासह कलर पॉट, क्रॅलिक कुंडी, सिंगल शॉट (पाच कलर), बटरफ्लाय, चिटपुट, पॉप अप (आपटबार), आयस्पीन, गोल्डर प्यार, रॉबिन, ड्रॅगन, जॉली, रेड चिली, मॅजिक मिक्स, सोनिक बॉम्ब (१२ शॉट्स कलर ) बिगकाँग, इंडियन बुलेट, हवेतील रॉकेट, पारंपरिक मातीच्या पाऊसकुंड्या या कमी आवाजाच्या शोभेच्या फटाक्यांना मागणी अधिक आहे. दरही अगदी दहा रुपयांपासून घेईल त्यानुसार आहेत.
जिल्ह्यात ८५० हून अधिक फटाके विक्रेते आहेत. न्यायालयाच्या निर्णय आमच्यावर बंधनकारक आहे. नियमानुसारच आम्ही फटाक्यांची विक्री करीत आहोत. मात्र, निर्णयाअगोदर खरेदी केलेल्या मालाचे काय करायचे, असा प्रश्न आमच्या विक्रेत्यांसमोर उभा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्क्यांनी फटाके विक्री कमी झाली आहे.- प्रकाश मिसाळ, संचालक, कोल्हापूर जिल्हा फटाका उत्पादक व विक्रेते संघटनाफटाक्यांतून होणारे प्रदूषण, महागाई, समाजमाध्यमांवरून होणारी जनजागृती या सर्वांबरोबरच आबालवृद्धांनी होणाºया परिणामांमुळे फटाके न उडविण्याबाबत मनावर घेतले आहे. लहान मुलांकडूनच हे फटाके तयार करून घेतल्याचे चित्र समोर आले होते. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.- अनिल चौगुले, निसर्गमित्र