शिरोळ : शहरात नव्याने ४०० विद्युत पोल बसविण्यात येणार आहेत. सुमारे ६८ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. शहरातील वाढीव वसाहत त्याचबरोबर ज्याठिकाणी विद्युत पोलची सुविधा नाही, अशा ठिकाणी पोल बसविण्यासाठी नगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वी पालिका सभेत ठराव केला होता. या ठरावाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यामुळे पोलसह तारा व स्ट्रीटलाईट बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहराची चाळीस हजारांहून अधिक लोकसंख्या असून वाढीव वसाहतीमुळे शहराचा विस्तार वाढला आहे. वसाहतीत विद्युत पोल नसल्यामुळे पथदिव्यांची सोय त्याचबरोबर लांब अंतरावरून लाईट कनेक्शन अशी परिस्थिती आहे. नागरिकांच्या अडचणी व रस्त्यांवर विद्युत पोलसह पथदिव्यांची सोय व्हावी, यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेत दोन महिन्यांपूर्वी १ ते ८ प्रभागांमध्ये सुमारे ४०० विद्युत पोल, तारा व स्ट्रीट लाईट नव्याने बसविण्याच्या विषयाला सभेत मंजुरी दिली होती. सुमारे ६८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यामुळे प्रस्ताव मार्गी लागला आहे. येणाऱ्या काळात ४०० हून अधिक विद्युत पोल बसविले जाणार असून एलईडी पथदिवे बसविण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.