कोल्हापूर/इचलकरंजी/बोरवडे : खाद्यतेलाच्या मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा केल्याप्रकरणी पुरवठा विभागाने शनिवारी छापा टाकून बोरवडे (ता. कागल) येथील सियेन ट्रेडर फर्म येथील ३७ लाख आठ हजार ४८० रुपयांचे खाद्यतेल ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इचलकरंजी येथील बिग बझारमध्ये तपासणी करून तीन लाख ८२ हजार २५७ रुपयांचे खाद्यतेल, खाद्यतेल बिया व डाळी ताब्यात घेऊन संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दिवाळीपर्यंत ही धडक कारवाई सुरू राहणार आहे. खाद्यतेल, डाळी आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा केला असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर छापे टाकून धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील भाडेतत्त्वावरील गोदामात एकत्रित सुमारे ९५ लाख रुपयांच्या खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा सापडला. या कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर कागल येथे किरकोळ खाद्यतेल परवानाधारक बरकत नायकवडी यांच्याकडे मर्यादेपेक्षा जादा साठा आढळल्याने तो ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारीही जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई केली. बोरवडे (ता. कागल) येथील सीयेन ट्रेडर फर्मवर छापा टाकण्यात आला. येथे मर्यादेपेक्षा अतिरिक्त ४६३.५६ क्विंटल इतका साठा असलेले ३७ लाख आठ हजार ४८० रुपयांचे खाद्यतेल ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इचलकरंजी येथील बिग बझारमध्ये तपासणी करून तीन लाख ८२ हजार २५७ रुपये किमतीचा अतिरिक्त साठा असलेली ९.१८ क्विंटल डाळ, १.२४ क्विंटल खाद्यतेल बिया व २२८२ लिटर खाद्यतेल ताब्यात घेऊन संबंधितांवर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
४१ लाखांचा तेलसाठा जप्त
By admin | Published: October 25, 2015 12:51 AM