कोल्हापूर : आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी पुढे ढकलल्या. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. मे, जून व जुलैमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी मात्र ठरल्याप्रमाणे २२ एप्रिलला मतदान होणार आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध नाही, आदी कारणांस्तव निवडणुका पुढे ढकलत असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाच्या सहायक आयुक्त पूनम शिरसोळकर यांनी दिले. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. २४) जून ते सप्टेंबर महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींचा व ४२ पोटनिवडणुकांचा समावेश होता; परंतु शनिवारी अचानक राज्य निवडणूक आयोगाने आदेशामध्ये बदल करीत फक्त जून व जुलै महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाच होतील असे जाहीर केले. जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मुदत संपणाऱ्या ४१६ ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अचानक निर्णय झाल्याने खळबळ उडाली. निवडणुका का पुढे ढकलल्या, याबाबत दिवसभर चर्चेला ऊत आला. उन्हाळी सुट्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध होण्यात अडचणी असे कारण आयोगाने दिले आहे. (प्रतिनिधी)
४१६ ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर
By admin | Published: March 29, 2015 12:14 AM