कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड व भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७३१२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इतर धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग असल्याने नद्यांची पातळी वाढत आहे. पंचगंगा नदी ३२.७ फुटांवर असून तब्बल ४३ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कागल, राधानगरी व शिरोळ तालुक्यांतील तीन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
मंगळवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असला तरी गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड या तालुक्यांत पाऊस कायम आहे. गगनबावडा तालुक्यात सलग अतिवृष्टी सुरू आहे. धरणक्षेत्रांतही जोरदार पाऊस सुरू असून राधानगरी धरणातून विसर्ग वाढला आहे. परिणामी भोगावती नदीची पाणीपातळी वाढली आहे. ‘चिकोत्रा’ वगळता सर्व धरणे तुडुंब झाल्याने प्रत्येक धरणातून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सर्वच नद्यांची पातळी वाढली आहे. पंचगंगेची पातळी ३३ फुटांपर्यंत पोहोचली असून जिल्'ातील ४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कागल तालुक्यातील वाळवा ते बाचणी, शिरढोण ते कुरुंदवाड व कसबा तारळे ते शिरगाव येथील बंधाऱ्यांवर पाणी आल्याने या मार्गावरील एस. टी.ची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्'ातील ४४ मालमत्तांची पडझड होऊन १० लाख २६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.बराच वेळ ऊनपावसाने थोडीशी विश्रांती घेतली. दिवसभरात बराच वेळ ऊन राहिले. मोठ्या सरींनंतर अर्धा-पाऊस तास ऊन राहिले; पण त्यानंतर जोरदार सरी कोसळतच होत्या.