कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. विविध रुग्णालयांत, तसेच स्वत:च्या घरात उपचार घेणारे ४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आतापर्यंत ३० हजार ९३६ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली.
शनिवारी सीपीआर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५० हजार ८५९ वर पोहोचली असून, त्यापैकी ४८ हजार ८०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी एका रुग्णाच्या मृत्यूसह १७५० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
गेल्या चोवीस तासांत महापालिका क्षेत्रात ३०, तर करवीर, राधानगरी, कागल तालुक्यात प्रत्येकी दोन, तसेच गडहिंग्लज, हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
-शहरात ३० हजार व्यक्तींना लसीकरण-
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत मोहीम सुरू झाल्यापासून ३० हजार ९३६ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असून, शनिवारी एका दिवसात २२७० व्यक्तींना ही लस देण्यात आली.