कोल्हापूर : गोकूळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक अपेक्षेप्रमाणे दुरंगी झाली असून २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात राहिल्याने आता खऱ्या अर्थाने खडाखडी सुरू झाली. पॅनल घोषणेनंतर उरलेल्या २०५ पैकी १६० जणांनी माघार घेतल्याने एकास एक लढतीचा मार्ग मोकळा झाला. सर्वसाधारण गटातून १६ जागांसाठी ३३, महिला गटातून २ जागांसाठी ५, एससी एसटीच्या एका जागेसाठी ३, ओबीसी व एनटीच्या प्रत्येकी एक जागेसाठी २ उमेदवार रिंगणात उरले आहेत. नेत्यांकडून विचार होईल या आशेने अर्ज ठेवलेल्यांनी मंगळवारी पॅनल घोषणा झाल्यावर लगेचच माघारीसाठी करवीर प्रांत कार्यालयाकडे धाव घेतली.
चौकट
तीन अर्ज जास्त
महिला गटातून वडणगेचे बाजीराव पाटील यांची पत्नी वैशाली यांची उमेदवारी राहिली आहे. अनुसूचित गटातून सत्तारूढकडून दिनकर कांबळे यांनी उमेदवारी मागितली होती, पण मिळाली नाही. त्यांनी माघार घेतली नाही. सर्वसाधारणमधून शामराव बेनके यांनीही माघार घेतली नाही.