लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे आई किंवा वडिलांचे निधन झालेली जिल्ह्यात ४५ मुले-मुली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. आई-वडील दोघेही कोरोनामुळे गेल्याने निराधार झालेली दोन बालके जिल्ह्यात आहेत. ही मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पालकांचा मृत्यू होऊन अनाथपण वाट्याला आलेली बालके शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत ही आमची जबाबदारी असेल. या बालकांना शासकीय योजनांचा लाभ कसा देता येईल याची पडताळणी करू, प्रसंगी दत्तक घेऊ पण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कोरोनाने अनाथपण आलेल्या या बालकांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. पुढील चार-पाच दिवसात सगळी माहिती मिळाली की त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल, शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ कसा मिळेल, ते सध्या काय शिक्षण घेत आहेत, पुढील शिक्षण याची सर्व जबाबदारी घेऊन एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. वेळ आलीच तर या बालकांना दत्तक घेतले जाईल.
कोरोनामुळे आईवडिलांचे निधन झालेल्या मुलांचे संगोपन व शैक्षणिक जबाबदारी घेण्यासाठी राज्य शासनाने खास कृतिदल स्थापन केले आहे. सांगली जिल्ह्याने खास हेल्पलाईन सुुरू केली आहे. अशा मुलांचे संगोपन करण्यासाठी कोल्हापुरात बालकल्याण संकुलसारखी शासकीय संस्थाही आहे. शिवाय कोल्हापूरचे जनमानस अशी कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार असते. त्यामुळे या मुलांची संख्या एकदा निश्चित झाल्यावर जिल्हा प्रशासनासही त्यांचे पुनर्वसन करणे शक्य होईल.